नवी मुंबई महापालिकेकडून खरेदीचा प्रस्ताव

मुंबईतील कमला मिल येथील अग्नितांडवाच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सर्व शहरांत आगीच्या व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजनांचा विचार सुरू झाला आहे. गगनचुंबी इमारतीत आग लागली असता इमारतीच्या खाली हवा भरलेल्या संरक्षक गाद्या (सेफ्टी कुशन) अंथरून अडकलेल्या व्यक्तींना त्यावर उडी मारण्यास सांगता येणे शक्य असते. अशा गाद्या खरेदी करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेत तयार केला जात आहे. अतिशय कमी कालावधीसाठी वापरण्यात येणारे हे कुशन घ्यावे की नाही या विचारात प्रशासन आहे.

नवी मुंबईत उंच इमारती मोजक्याच आहेत. पामबीच मार्गावर अशा इमारतींची संख्या जास्त आहे. सिडकोच्या निकृष्ट इमारतींच्या पुनर्बाधणीनंतर शहरात उंच इमारतींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमला मिल येथे उंच इमारतीतील मोझेस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीत १४ ग्राहकांचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाला. बाहेर पडण्याचा मार्ग माहीत नसल्याने त्यांना आगीच्या ज्वाळांनी घेरले. त्यामुळे त्यांनी सुरक्षेसाठी शौचालयाचा आधार घेतला आणि धुरात गुदमरून मृत्यूमुखी पडले. सर्वसाधारपणे आग लागलेल्या इमारतीतून बाहेर पडण्याचे मार्ग आगीमुळे बंद झाल्यानंतर खिडकीतून उडी मारणे किंवा खाली उतरणे हा एकमेव मार्ग शिल्लक राहतो, मात्र असे करताना जीव जाण्याची भीती जास्त असते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था नसल्यास उडी मारण्यास रहिवासी तयार होत नाहीत.

अहमदाबाद, पुणे, ठाणे येथील अग्निशमन दलाने घेतलेल्या सेफ्टी कुशन विकत घेण्याचा पालिका प्रशानच विचार करीत आहे. याची किंमत सुमारे १८ लाखा पर्यंत आहे. उंच इमारतींच्या खाली १२बाय ७ चे हे कुशन ठेवल्यानंतर रहिवाशांनी बिनधास्त त्यावर उडय़ा मारल्यानंतर तेथील पहिला थर अंकुचण पावणार आहे. दुसऱ्या रहिवाशासाठी तो लागलीच हवा भरुन तयार केला जाणार आहे. त्यामुले अंकुचन प्रसरण प्रक्रियेवर असलेल्या या कुशन वर उडी मारल्यास वाचण्याची एक संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका हे कुशन घेण्याचा विचार करीत आहे मात्र त्याची चाचपणी केल्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे.

जगात अनेक दुर्घटनांत सेफ्टी कुशन वापरण्यात आले आहे. या संरक्षक गाद्यांचा वापर खूप कमी वेळा होईल किंवा होणारही नाही. तरीही आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या सर्व सोयी तयार ठेवणे हे महापालिकेचे काम आहे. त्यामुळे त्याचा किती वापर होईल, यापेक्षा त्यामुळे किती रहिवाशांचे प्राण वाचतील याचा विचार करून कुशन घेण्याबाबत प्रशासन निर्णय घेणार आहे.

अंकुश चव्हाण,

अतिरिक्त आयुक्त. नवी मुंबई पालिका