24 February 2019

News Flash

करावे तलावाचे रूप पालटणार

तलावात गाळ साचल्याने ज्वेल ऑफ नवी मुंबईमधील जॉगिंग ट्रॅकवरून चालणाऱ्यांना दुर्गंधी सहन करावी लागते.

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : नवी मुंबईकरांचे आकर्षणस्थळ असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबईलगतच्या करावे धारण तलावाचे सुशोभीकरण करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी ५ कोटी ७२ लाखांच्या अंदाजित खर्चाचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे. त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या लगत १० एकर जागेवर करावे जंक्शनजवळ हा विस्तीर्ण धारण तलाव (होल्डिंग पाँड) आहे. सिडकोकाळापासून शहरात असलेल्या आणि शहर जलमय होण्यापासून रोखणाऱ्या या तलावाचे नैसर्गिक सौंदर्य ज्वेल ऑफ नवी मुंबई साकारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर करावे तलावाचे सुशोभीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्तावाला आयुक्तांनी प्रशासकीय मंजुरी दिली असून येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.  तलावात गाळ साचल्याने ज्वेल ऑफ नवी मुंबईमधील जॉगिंग ट्रॅकवरून चालणाऱ्यांना दुर्गंधी सहन करावी लागते. त्यामुळे तलाव स्वच्छ आणि सुशोभीत करण्यात येणार आहे. पदपथ, हिरवळ, विविध झाडे, फलक लावण्यात येणार आहेत. आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. पदपथ, नाला सुधारणा, गटारे बांधणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत. ज्वेल ऑफ नवी मुंबई, त्या शेजारीच अमृत योजनेतून साकारण्यात येत असलेली आकर्षक हिरवाई, लगतच्या तांडेल मैदानाचा कायापालट होत असून आता करावे तलाव विकसित होणार असल्याने नवी मुंबईकरांना पामबीच किनारी विस्तीर्ण जागेत निसर्गाचे सान्निध्य लाभणार आहे. ‘गेल्या आठवडय़ात मुसळधार पावसाचे पाणी करावे परिसरात पामबीच लगतच्या घरांमध्ये शिरले होते. तलावात गाळ साल्यामुळे व पाणी वाहून नेणारा पाईप छोटा असल्याने ही स्थिती उद्भवली होती. तलावाच्या सुशोभीकरणाची सातत्याने करण्यात येत होती. तलाव सुशोभीकरणामुळे परिसर आणखी सुंदर होणार आहे,’ असा विश्वास नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी व्यक्त केला.

First Published on July 14, 2018 3:14 am

Web Title: nmmc to make beautification of karve lake