News Flash

‘मोरबे’चे पाणी आता दिघ्यापर्यंत

स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई महापालिका ही देशातील पहिली पालिका आहे

महापालिकेकडून ११ कोटींचा खर्च

नवी मुंबई : अतिरिक्त पाच एमएलडी पाणी देण्याची सिडकोची मागणी पालिकेने फेटाळली आहे. त्यामुळे भविष्यात खारघरला पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नववर्षांत मोरबे धरणाचे पाणी दिघ्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने वेगाने काम सुरू केले आहे. या योजनेमुळे ऐरोली, दिघा आणि रबाळेसह एमआयडीसी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे.

स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई महापालिका ही देशातील पहिली पालिका आहे. खालापूरनजीक धावरी नदीवर हे धरण आहे. नवी मुंबई महापालिकेचा प्रतिदिन ४५० दशलक्ष लिटर क्षमतेचा हा स्वत:च्या मालकीचा जलस्रोत आहे. भोकरपाडा येथे ४५० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे.

नवी मुंबई शहरात मोरबे धरणातून दिवसाला अंदाजे ४३० एमएलडी पाणी उचलले जाते. तर याच धरणातून उचललेल्या पाण्यावर भोकरपाडा येथे प्रक्रिया केली जाते. या धरणातून उचललेले पाणी मोरबे धरणानजीकच्या गावांना पाच एमएलडी पाणी दिली जाते. तर पुढे सिडकोने वसवलेल्या कामोठे भागासाठी ३५ दशलक्ष लिटर पाणी दिले जाते. तर पुढे येऊन पाच एमएलडी पाणी हे खारघर उपनगरासाठी दिले जाते. तर उर्वरित पाणी नवी मुंबई शहराला दिले जाते. परंतु पालिकेच्या इतिहासात आजवर मोरबेचे पाणी दिघ्यापर्यंत पोहोचलेले नाही.

ऐरोली, दिघा आणि रबाळे या परिसरातील झोपडपट्टी आणि परिसरातील लाखो रहिवाशांना अद्याप एमआयडीसीकडून पालिका ५५ एमएलडी पाणी घेऊन नवी मुंबई शहरातील आणि एमआयडीसीलगतच्या  झोपडपट्टी भागात पाणी पोहोचवले जाते, परंतु पालिकेने मोरबेचे पाणी दिघ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी सुमारे ११ कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातील ५ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी खारघर नोडला देण्याची मागणी सिडकोने आमच्याकडे केली होती. त्याला आम्ही नकार दिला आहे. त्यांना त्याबाबत लेखी दिले आहे. दुसरीकडे आम्हाला मोरबेचे पाणी दिघ्यापर्यंत घेऊन जायचे आहे.

– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई महापालिका

मोरबेचे पाणी दिघा व ऐरोलीपर्यंत येणार असल्याने हे पाणी लवकरात लवकर सुरू झाल्यास या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

– विजय चौगुले, विरोधी पक्षनेता

रोज ४५० दशलक्ष लिटर

महापे एमआयडीसी ते दिघा, ऐरोलीपर्यंतच्या टप्प्यात एक लाखाहून नागरिकांना याचा फायदा होणार आहे. यासाठी धरणातून प्रतिदिन सुमारे ४५० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांनी दिली आहे.

पाणीटंचाईचा सामना

या परिसरातील नागरिकांना एमआयडीसीकडून पालिका ९ रुपये दराने घेत असलेल्या ५५ ते ६५ एमएलडी पाणी दिले जाते. परंतु एमआयडीसीत आठवडय़ातून एकदा २४ तासांचा शटडाऊन घेतला जातो. त्यामुळे या परिसरात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

* धरणाची क्षमता- प्रतिदिन ४५० दशलक्ष लिटर

*  धरणाची लांबी- ३२५० मीटर

*  माथा पातळी- ९३ मीटर

*  उच्चतम पाणी पातळी- ९०.५० मीटर

*  पूर्ण पाणी संचय पातळी- ८८ मीटर

* एकूण पाणीसाठा क्षमता- १९०.८९ दशलक्ष घनमीटर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:40 am

Web Title: nmmc to supply morbe dam water in digha zws 70
Next Stories
1 शहरबात : नवी मुंबई मेट्रोचा खेळखंडोबा
2 ३० विद्युत बस प्रवाशांच्या सेवेत
3 विमानतळ प्रकल्पग्रस्त आक्रमक
Just Now!
X