नवी मुंबई पालिका प्रशासनासह अवघ्या शहरावर शोककळा

नवी मुंबई : करोनामुळे गावी असलेले कुटुंब नवी मुंबईत परत घेऊन येत असताना काळाने घाला घातला आणि यात पालिकेचे पशुवैद्यकीय डॉ. वैभव झुंजारे यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगी व आई यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यांचा एक मुलगा गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शहरात शोककळा पसरली असून एकाच वेळी चार जणांचा अंत्यविधीचा  प्रसंग मन पिळवटून टाकणारा होता.

मंगळवारी अपरात्री दीडच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावरील खालापूर टोल नाक्याजवळ हा विचित्र अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पालिकेत शोककळा परसरली होती. कुटुंबातील सदस्य हरपल्याची भावना यानंतर अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

झुंजारे यांच्यासह अन्य तिघांचे मृतदेह वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात आणण्यात आले होते. दुपारी तीननंतर त्यांच्या राहत्या घरी, माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयाजवळ असलेल्या मनपा आरोग्य विभागाच्या वसाहतीत आणण्यात आल्यानंतर पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील  मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे सासू-सासरे आल्यानंतर वातावरण अजूनच भावुक झाले होते. घरातून स्मशानभूमीत एकाच वेळी चार मृतदेह घेऊन जात असतानाचे ते दृश्य पाहून प्रत्येकाचेच डोळे पाणावले होते. पालिका आयुक्त अभिजित बांगर हे सुमारे अर्धा तास झुंजारे यांच्या घरी त्यांच्या वडिलांसह नातेवाईकांना आधार देत होते. सर्वच विभागांतील उपायुक्त, कर्मचारी शेवटपर्यंत उपस्थित होते.  डॉ. झुंजारे यांचे कुटुंबीय करोनाकाळात सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे गावी होते. शहरातील करोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याने त्यांना नवी मुंबईत आणण्यासाठी डॉ. झुंजारे गावी गेले होते. त्याच्यासोबत वडीलही येणार होते, मात्र ते काही कारणास्तव मागे राहिले होते. प्रवासादरम्यान डॉ. अजय गडदे यांची भेट झाली होती. गडदे हे एका लग्नासाठी पुण्याला गेले होते. अपघातापूर्वी गडदे हे नवी मुंबईच्या दिशेने निघून गेले आणि काही वेळातच त्यांनाही ही वाईट बातमी समजली.

 

सर्वाना बरोबर घेऊन जाणारे अधिकारी

डॉ. झुंजारे हे ९ जुलै २००७ मध्ये नवी मुंबई पालिकेत रुजू झाले होते. अतिशय हुशार आणि सर्वाना बरोबर घेऊन जाणारे अधिकारी अशी त्यांची ओळख होती. करोनाकाळात सर्वात कठीण काम असलेल्या करोना रुग्णांची वाहतूक ही जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. या काळात औषध वितरण व्यवस्थेची घडीही त्यांनी बसवली. दिवसरात्र काम आणि करोना रुग्णांचा नकळत सहवास आल्याने त्यांनाही करोना झाला होता. त्यातूनही ते सहीसलामत बाहेर आले होते. झुंजारे यांच्या निधनानंतर शहरातील चिकन, मटण विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवत त्यांच्या अंत्ययात्रेत ते सहभागी झाले होते. झुंजारे यांच्या मागे मुलगा अर्णव, विवाहित बहीण, एक भाऊ  आणि वडील आहेत.

मुलाची प्रकृती स्थिर

झुंजारे यांचा मुलगा अर्णव हा या अपघातात वाचला असून त्याच्यावर सध्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यालाही जबर मार लागला आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.