शीव-पनवेलवरील पादचारी मार्ग स्वच्छ न केल्यास गुन्हा नोंदवणार; नवी मुंबई पालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा

शीव-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्गाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट सोडल्यामुळे त्यात पाणी साचून डासांची उत्पत्ती झाली आहे. हे मार्ग स्वच्छ न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा नवी मुंबई महापालिकेने दिला आहे. या मार्गामध्ये गुडघाभर पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होत आहे. नवी मुंबई महानरपालिका अधिकाऱ्यांनी नुकतीच या भुयारी मार्गाची पाहणी केली असून त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘सायन पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला महामार्गचे काम दिले होते. पादचाऱ्यांना महामार्ग ओलांडणे शक्य व्हावे म्हणून भुयारी मार्ग बांधण्याचे काम हाती घेण्यात आले, परंतु ते अर्धवट सोडण्यात आले. आता या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मार्गाची साफसफाई न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागावर डासउत्पत्ती केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिला आहे.

भुयारी मार्गामध्ये कचरा आणि गुडघाभर पाणी साचले आहे. विजेचे दिवे नसल्यामुळे तिथे सदैव अंधार असतो. त्याचा गैरफायदा घेत गर्दुल्ले तिथे अड्डा जमवतात. अर्धवट सोडलेल्या कामामुळे शहर विद्रूप दिसते. शीव-पनवेल महामार्गाच्या दुतर्फा सुशोभीकरण करावे, अशी मागणी महापालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. तसेच पुलाखाली पार्किंगसाठी जागा देण्यात यावी. भुयारी मार्गाची झालेली दयनीय अवस्था सुधारावी, अशी मागणी पालिकेने केली आहे.

रस्त्याच्या दुतर्फा सुशोभीकरण

सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या दुतर्फा सुशोभीकरण करायचे नसेल तर ही जागा सुशोभीकरणासाठी पालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी पालिकेने केली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असणारी जागा महापालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव अशीषकुमार सिंग यांच्याकडे केल्याचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी सांगितले.