रहिवाशांकडून लेखी घेत वीज, पाणी जोडणी

नवी मुंबई नवी मुंबई महापालिकेने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात वाशीतील ११ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे हे प्रकरण विधानसभेपर्यंत गेले. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतल्यानंतर  ही कारवाई स्थगित करण्यात आली होती. ज्या इमारतींवर कारवाई करण्यात आली, त्यांचा वीज व पाणी पुरवठा शनिवारी पालिकेने पुन्हा पूर्ववत केला असून रहिवाशांकडून लेखी घेत त्यांना इमारत रिकामी करण्यासाठी मुदत दिली आहे.

अधिवेशन संपल्यानंतर ही कारवाई होणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत.

शहरात अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित सी १ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ५५ इमारती आहेत. अतिधोकादायक २३ इमारतींवर शुक्रवारी कारवाई सुरू केली. उत्कर्ष सोसायटीत १, गुलमोहर सोसायटीतील ७, आशीर्वाद सोसायटीतील ३ अशा ११ अतिधोकादायक इमारतीमधील विद्युत व पाणीपुरवठा खंडित केला होता. यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष होता.

यामुळे शनिवारी आमदार मंदा म्हात्रे यांनी येथील रहिवाशांची भेट घेतली. त्यानंतर पालिकेने त्यांचा वीज व पाणीपुरवठा पूर्ववत केला. मात्र या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास नागरिक जबाबदार असल्याचे लिहून घेतले आहे. तसेच रहिवाशांना घरे खाली करण्याबाबत ठरावीक दिवसाची मुदत देण्यात आली असल्याचे पालिकेचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी सांगितले.

आतापर्यंत ज्यांची येथे सत्ता होती त्यांनी या नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यांच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये. वाशी येथे नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. रहिवाशांना घरे सिडकोकडून की विकासकाकडून हवीत, त्याबाबत रहिवाशांनी निवेदन देण्याची आवश्यकता आहे. पुनर्विकासातील घरांबाबत मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.