‘बेस्ट’चा संप नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या पथ्यावर पडला असून संपाच्या आठ दिवसांत तब्बल ४५ लाख रुपयांचा अतिरिक्त गल्ला जमला आहे. रोज ४० बस अधिकच्या सोडण्यात आल्या तर ११० फेऱ्यांत वाढ करण्यात आली होती.

बेस्ट बसच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी आठ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाचा आर्थिक फायदा एनएमएमटीला झाला आहे. रोज सुमारे ५ लाख रुपयांची अतिरिक्त वाढ होत होती. यासाठी एनएमएमटीने मुंबईत जाणाऱ्या नियमित मार्गाव्यतिरिक्त अतिरिक्त गाडय़ाही बेस्टच्या मार्गावर चालवल्याने उत्पन्नात भरघोस वाढ होऊ  शकली. यात ज्या ज्या मार्गावर बेस्टला मोठय़ा प्रमाणावर प्रवासी मिळतात, या मार्गावर एनएमएमटी चालवण्यात आल्याचे एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.