संतोष जाधव

‘एनएमएमटी’ची आर्थिक कोंडी

‘बेस्ट’ तिकीट दरकपातीमुळे ‘एनएमएमटी’चे दिवसाला २० ते २१ हजार प्रवासी कमी झाले आहेत. त्यात शहरात बेकायदा प्रवासी वाहतूकही मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. बस येण्यापूर्वी ही वाहने प्रवाशांना घेऊन जात आहेत. या वाहतुकीला आळा घातल्यास ‘एनएमएमटी’चे प्रवासी वाढतील व त्यांचा तोटा भरून निघू शकतो.

नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बससेवा महापालिकेच्या अनुदानावर सुरू आहे. त्यात ‘बेस्ट’ने ९ जुलैपासून त्यांचे तिकीट दर कमी केले. या निर्णयाचा नवी मुंबई महापालिकेच्या ‘एनएमएमटी’ बस सेवेवर परिणाम दिसू लागला. दिवसाला २० ते २५ हजार प्रवासी कमी झाले आहेत. महिनाभरात सुमारे १ ते दीड कोटींचा आर्थिक फटका बसत आहे. पासधारकांची संख्याही घटली आहे. ‘बेस्ट’प्रमाणे तिकीट दर कमी केले तर काही प्रवासी वाढतील मात्र ‘एनएमएमटी’चा तोटा मात्र वाढणार आहे. यातून सावरायचे कसे हा प्रश्न ‘एनएमएमटी’ प्रशासनासमोर आहे. त्यामुळे प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.

नवी मुंबई शहरात प्रवासासाठी रेल्वे, एनएमएमटी, बेस्ट, रिक्षा या वाहनांचा वाहतुकीसाठी वापर केला जात आहे. असे असताना बेकायदा प्रवासी वाहतूकही मोठय़ा प्रमाणात होत आहे. रेल्वेस्थानके तसेच प्रवाशांच्या मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी ही बेकायदा वाहने मोठय़ा प्रमाणात उभी असतात. बससेवा बसथांब्यावर येण्याअगोदरच ते प्रवाशांना घेऊन जात आहेत. याचा परिणामही ‘एनएमएमटी’च्या उत्पन्नावर होत आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे बेकायदा प्रवासी वाहतुकीवर कारवाईचे अधिकार आहेत. शहरात अनेक ठिकाणी खासगी बस, टॅक्सी, टमटम अशा वाहनांद्वारे अवैध वाहतूक केली जाते. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे वारंवार लेखी तक्रारी करण्यात आल्याचे  एनएमएमटी  व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.

शीव-पनवेल महामार्गावर तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी ही बेकायदा प्रवासी वाहतूक होत असते. तसेच पामबीच मार्गावरूनही बेकायदा वाहतूक होत आहे.

या वाहतुकीला उपप्रादेशिक विभागाचे पाठबळ आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत असतो. शहराच्या विविध भागांत सुरू असलेल्या अवैध वाहतुकीला जर आळा घालण्यात यश आले तरीही ‘एनएमएमटी’चे प्रवासी वाढतील, असे जाणकार सांगत आहेत.

शहरात विविध ठिकाणी दररोज दोन ते अडीच हजार बेकायदा प्रवासी वाहतूक करताना दिसतात. त्यामुळे फक्त ‘एनएमएमटी’चे दिवसाला सहा लाखांचे उत्पन्न बुडत असल्याची माहिती ‘एनएमएमटी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बेकायदा वाहतुकीची ठिकाणे

जुईनगर ते खारघर, उरण ते तळोजा, बेलापूर ते एमजीएम हॉस्पिटल, सानपाडा ते महापे, सानपाडा ते डोंबिवली, घणसोली ते लोढा, ठाणे ते ऐरोली, नेरुळ स्थानक पूर्व ते उलवे, वाशी उड्डाणपुलाखालील एसटी बसथांबा, नेरुळ एलपी बसथांबा, कामोठे.

खारघर ते मंत्रालय खासगी बससेवा

खारघर ते मंत्रालय ‘एनएमएमटी’ची वातानुकूलित बससेवा आहे. सकाळी दोन व संध्याकाळी एक अशा तीन फेऱ्या होतात. मात्र, याच गाडीच्या अगोदर खारघर येथून एक बेकायदा छोटी बस खारघर ते मंत्रालय धावते. त्याचे ऑनलाइन तिकीट दिले जात आहे. यामुळे ‘एनएमएमटी’चे प्रवासी कमी झाले आहेत. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे ‘एनएमएमटी’कडून तक्रार करूनही कारवाई होत नाही.

नवी मुंबई शहरात सुरू असलेल्या बेकायदा प्रवासी वाहनांवर कारवाई केली जाते. यासाठी पाच दिवसांची विशेष कारवाई मोहीमही हाती घेतली जाणार आहे. यात खासगी बस, कार, विनापरवाना टॅक्सी, रिक्षांवर कारवाई करण्यात येईल.

– दशरथ वाघुले, उपप्रादेशिक अधिकारी, नवी मुंबई