28 October 2020

News Flash

आयुक्तांचा सत्ताधाऱ्यांना धक्का!

बसथांब्यावरील जाहिरातींचा ठेका रद्द करण्याच्या ठरावाच्या विखंडनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे

|| संतोष जाधव

बसथांब्यावरील जाहिरातींचा ठेका रद्द करण्याच्या ठरावाच्या विखंडनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे

नवी मुंबई महापालिकेत प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांत आता नवी ठिणगी पडली आहे. नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसथांब्यांवर उभारण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या ठेक्याचा प्रस्ताव सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी परिवहन समितीत बहुमताच्या जोरावर फेटाळून लावला आहे. आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आलेल्या परिवहन उपक्रमासाठी महत्त्वाचा असलेला हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी हा नामंजुरीचा ठराव आता विखंडनासाठी राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठवला आहे.

गेल्या काही महिन्यांत सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला ठराव राज्य शासनाकडून विखंडित करण्यासाठी आयुक्तांनी पाठवलेला हा चौथा प्रस्ताव आहे. याआधी लिडार सर्वेक्षण, ईआरपी सॉफ्टवेअर, राव व कुलकर्णी यांना सामावून घेणे यासंदर्भातील सत्ताधाऱ्यांचे ठरावही आयुक्तांनी विखंडनासाठी राज्य सरकारकडे पाठवले आहेत.  त्यामुळे पालिकेत प्रशासन विरुद्ध सत्ताधारी असा वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली असून त्याला बळकटी देण्याचे प्रयत्न आयुक्त रामास्वामी यांनी चालवले आहेत. याचाच एक भाग म्हणून वाशी येथील एनएमएमटीच्या बसस्थानकाचा पुनर्विकास करून त्याठिकाणी वाणिज्य संकुल व बसस्थानकही उभारण्याचा प्रकल्प आखण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील एनएमएमटीच्या बसथांब्यांची उभारणी करून त्यावर जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी ठेका देण्याचा प्रस्तावही प्रशासनाने आखला आहे. सुमारे वर्षभरापूर्वी आखलेली ही योजना निविदा प्रक्रियेत बराच काळ रेंगाळल्यानंतर या कामासाठी ठेकेदार मिळाला. सर्वाधिक ४१ कोटी ५५ लाख रुपयांची त्याची निवदा आहे. त्यानुसार जाहिरात हक्कांचे वाटप करण्याचा ठराव परिवहन समितीत मंजुरीला आला. परंतु, परिवहन समितीत बहुमत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी तो फेटाळून लावला. आपल्या मर्जीतील ठेकेदाराला हे काम न मिळाल्याने संबंधित प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचा आरोप परिवहन समितीतील विरोधी सदस्यांनी केला आहे.

दरम्यान, परिवहनच्या उत्पन्नवाढीसाठी आवश्यक असलेला हा ठराव मंजूर करून घेण्यासाठी आयुक्तांनी कंबर कसली असून आता सत्ताधाऱ्यांनी नामंजूर केलेल्या ठरावाचे विखंडन करण्यासाठी आयुक्तांनी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. यापूर्वीही सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाचे प्रस्ताव फेटाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही आयुक्त आणि सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा निर्माण झाला होता. आयुक्तांनी प्रशासनाचे प्रस्ताव महासभेत पास केल्याशिवाय इतर प्रस्ताव महासभेत न पाठवण्याची भूमिका घेतली होती.

आधीच्या ठेकेदाराची थकबाकी

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बस व बसथांब्यावर जाहिराती लावण्याचे कंत्राट मे. रोनक अ‍ॅडव्हर्टाईजिंग व मीडिया सव्‍‌र्हिसेस या कंपनीकडे आहे. मात्र, त्याने पालिकेच्या जाहिरात परवाना शुल्क आकारणीचे ७७ लाख ५४ हजार रुपये थकवले आहेत. या ठेकेदाराला हा ठेका मिळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळल्याचा आरोप होत आहे.

एनएमएमटी उपक्रमाला सातत्याने महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. २५० बसथांब्यांबाबत व त्यावरील जाहिरात हक्कातून परिवहनला ४१.५५ कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. तसेच अधिकाधिक बसथांब्यांच्या उभारणीमुळे उलव्यासारख्या नवीन नोडमध्ये प्रवासी संख्येतही वाढ होऊ शकणार आहे. हा प्रस्ताव फेटाळणे चुकीचे असल्याने तो विखंडनासाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.     – डॉ. रामास्वामी एन., आयुक्त नवी मुंबई महापालिका

सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतल्या ठेकेदाराला ठेका मिळणार नसल्यामुळेच प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. आयुक्तांनी हा प्रस्ताव विखंडनासाठी पाठवायलाच हवा. आयुक्तांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो.     – समीर बागवान, परिवहन सदस्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2019 1:14 am

Web Title: nmmt bus navi mumbai municipal corporation
Next Stories
1 भरधाव मोटारीने उडविल्याने माय-लेकाचा मृत्यू
2 कचरा वाहतूक गाडय़ांमुळे अस्वच्छता
3 झोपडपट्टीत नालेसफाईचा बोजवारा
Just Now!
X