राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे, असा दावा सरकार तरी जोरजोराने करीत आहे; परंतु रायगड जिल्ह्य़ातील तळोजा औद्योगिक वसाहतीतून मंगळवारी सुरू होणाऱ्या एनएमएमटीच्या ७१ क्रमांकाच्या बसला पोलीस संरक्षण द्यावे लागणार आहे. पाच वर्षांपूर्वी या बससेवेला स्थानिक रिक्षा चालकांनी जोरदार विरोध करीत बससेवा बंद पाडली होती; परंतु पोलिसांच्याच पुढाकाराने ही बस पुन्हा सुरू करण्यात येत आहे. रिक्षाचालकांचा कोणत्याही प्रकारचा विरोध या बसला होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सेवेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन आणि पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांना दिल्या आहेत.
एनएमएमटीची तळोजा औद्योगिक वसाहत ते बेलापूर रेल्वेस्थानक अशी थेट बससेवा मंगळवारपासून सुरू करण्यात येत आहे. ७१ क्रमांकाची बस अध्र्या तासाच्या अंतराने सुटेल. अशा ५ बसगाडय़ा या मार्गावर धावतील. औद्योगिक वसाहत ते बेलापूर स्थानक यातील अंतरासाठी २१ रुपये तिकीट असेल. या मार्गावर थेट बससेवा नसल्याने प्रवाशांना सहा आसनी आणि तीन आसनी रिक्षाने प्रवास करावा लागत होता. सकाळी बेलापूर रेल्वेस्थानकातून ६ वाजता ही बस सुटेल तर हायकल कंपनीसमोरून ६.५५ वाजता पहिली बस सुटेल. बेलापूर स्थानकातून शेवटची रात्रीची बस ९ वाजून पाच मिनिटांची असेल तर वसाहतीमधून रात्री शेवटची बस १० वाजून १० मिनिटांची असेल.