दोन आठवडय़ांत २१ हजार प्रवासी घटले; दिवसाला चार लाखांचा तोटा

नवी मुंबई दोन आठवडय़ापूर्वी ‘बेस्ट’ परिवहन उपक्रमाने केलेल्या तिकीट दर कपातीचा नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाला चांगलाच फटका बसला आहे. ‘एनएमएमटी’ची २१ हजार प्रवासी संख्या कमी झाली आहे. यामुळे अगोदरच तोटय़ात असलेल्या ‘एनएमएमटी’ला चार लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

मुंबईतील ‘बेस्ट’ उपक्रमाने प्रवासी संख्या वाढविण्यासाठी तिकीट दरात कपात केली आहे. त्यामुळे ‘बेस्ट’ची प्रवासी संख्या थेट चार ते पाच लाखाने वाढली आहे, पण ९० लाखाने उत्पन्न घटले आहे. ‘बेस्ट’च्या या तिकीट दरकपातीचा सर्वाधिक फटका ‘एनएमएमटी’ला बसला आहे.

नवी मुंबईतून मुंबईतील विविध सहा मार्गावर ‘एनएमएमटी’च्या बसेस धावत आहेत. याशिवाय नवी मुंबईतील अंतर्गत मार्गावरही ‘बेस्ट’च्या बस बारा समांतर मार्गावर धावत आहेत. ‘बेस्ट’च्या तिकीट कपातीमुळे या मार्गावरील २० ते २१ हजार प्रवाशांनी ‘एनएमएमटी’कडे पाठ फिरवली आहे. आर्थिकदृष्टय़ा हा तोटा दिवसाला चार लाखापर्यंत आहे.

नवी मुंबईत ‘बेस्ट’च्या सर्वाधिक १४४ गाडय़ा दिवसाला धावत आहेत. सिडकोची ‘बीएमटीसी’ बंद पडल्यानंतर ‘बेस्ट’ व ‘एसटी’च्या बसेस नवी मुंबईकरांची प्रवासी गरज भागवत होत्या. ‘एसटी’च्या बसेसने अंतर्गत वाहतूक बंद केली, पण ‘बेस्ट’ ने आपला उत्पन्नाचा हा मार्ग सोडला नाही. त्यामुळे ‘बेस्ट’च्या दर कपातीचा तोटा ‘एनएमएमटी’ला बसला आहे. हा फटका असाच वाढत राहिला तर ‘एनएमएमटी’लाही ‘बेस्ट’प्रमाणे प्रवासी स्वागत योजना राबवण्याची गरज भासणार आहे.

‘बेस्ट’च्या कमी तिकीट दराचा फटका ‘एनएमएमटी’ला बसला असून २० हजार प्रवासी कमी झाले आहेत. ‘बेस्ट’ची ही योजना यशस्वी झाली तर सर्व सार्वजनिक उपक्रमांना कमी तिकीट दर आणि जास्त प्रवाशांचा विचार करावा लागेल. यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन प्रदूषण घटणार आहे.

-शिरीष आरदवाड, व्यवस्थापक ‘एनएमएमटी’

प्रवासी शोधावे लागणार

रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर यांनी चोरलेल्या प्रवाशांना आपल्याकडे खेचण्यासाठी ‘बेस्ट’ने ही दर कपात योजना राबवली आहे. नवी मुंबईतही रिक्षा आणि खाजगी वाहतूकदारांनी एनएमएमटीचे प्रवासी आपल्याकडे खचले आहेत. त्याचा शोध घेऊन त्यांना एनएमएमटीकडे आकर्षित करावे लागणार आहे. उदारणादाखल ‘एपीएमसी’तील नवी मुंबईबाहेरचे सर्व व्यापारी हे खाजगी बस आणि कारने घरी जातात. या प्रवाशांना देखील खेचावे लागणार आहेत.