‘एनएमएमटी’ला अनुदान देण्यास पालिकेची तयारी

पनवेल : पनवेल महापालिकेकडून अनुदानाची रक्कम न मिळाल्याने बंद करण्यात आलेले ज्येष्ठ नागरिकांसाठीचे ‘एनएमएमटी’चे सवलतीतील पास पुन्हा सुरू होणार आहेत. नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या अनुदानाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे पनवेलचे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सांगितले आहे.

‘एनएमएमटी’ने सप्टेंबर २०१८ पासून बसमधून प्रवास करणाऱ्या पनवेलमधील ज्येष्ठ नागरिकांना दिलेले सवलतीचे पास देणे बंद केले आहे. ५० रुपयांमध्ये काढलेला पास दाखविल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या तिकीटदरात एनएमएमटी बसमधून प्रवास करता येत होता. नवी मुंबई पालिका, कल्याण डोंबिविली पालिका अशाच प्रकारे ज्येष्ठ नागरिकांनी काढलेल्या पासचे अनुदान एनएमएमटी प्रशासनाला देत असल्याने पनवेल पालिकेनेही अनुदानाची रक्कम भरावी अशी मागणी ‘एनएमएमटी’कडून करण्यात आली आहे. मात्र पनवेल महापालिकेकडून हे अनुदान मिळत नाही व परिवहन उपक्रम तोटय़ात असल्याने ही पास योजना बंद करण्यात आली आहे.

पनवेलच्या महापौर चौतमोल यांनी एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांची नुकतीच भेट घेऊन ही पास योजना सुरू करण्याविषयी चर्चा केली आहे. अनुदान देण्याविषयी लवकरच पनवेल पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्याचेही आश्वासन दिले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय पटलावर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासासाठी सवलतीचा विषय स्वत: महापौर चौतमोल सभागृहासमोर ठेवणार आहेत. त्यानंतर सार्वजनिक हिताच्या या ठरावाला सभागृहातील सत्ताधारी बाकांवर बसणारे भारतीय जनता पक्षाचे सदस्य पाठिंबा देतील, असे सांगितले जात आहे. या ठरावानंतर आर्थिक तरतुदीसाठी प्रशासनाच्या मान्यतेनंतर तात्काळ ज्येष्ठ नागरिकांची एनएमएमटी बससेवेची सवलतीचे पास पुन्हा सुरू होतील.

विद्यार्थी, अपंगांनाही सवलत?

ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थिनीं, अपंगांनाही सवलतीची पास योजनेचा लाभ झाला पाहिजे अशी भूमिका यापूर्वी पनवेल पालिकेच्या सभागृहात अनेक सदस्यांनी मांडली होती. ज्येष्ठांसाठीचा ठराव मांडल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थिवर्ग, अपंग व्यक्तींचा समावेश करावा अशी मागणी सदस्यांकडून होण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटीच्या बससेवेमधून यापूर्वी सवलतीचा पास दिला जात होता. त्याचप्रमाणे पुढेही सवलत मिळावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. एनएमएमटी प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच त्याबद्दल सभागृहात विषय सदस्यांशी चर्चा केली जाईल व यावर तोडगा काढला जाईल. – डॉ. कविता चौतमोल, महापौर, पनवेल पालिका