घरावर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ‘ओएसडी’चा ताबा

नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) महाव्यवस्थापकांसाठी नेरुळ येथील अनिवासी भारतीय संकुलात घेण्यात आलेल्या प्रशस्त निवासस्थानावर राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष परदेशी या अधिकाऱ्याने गेली आठ वर्षे कब्जा केलेला आहे. एनएमएमटीच्या वतीने अनेक वेळा नोटीस देऊनही हे महाशय महाव्यवस्थापकांचे घर खाली करण्यास तयार नाहीत. विखे पाटील यांचे ओएसडी होण्यापूर्वी परदेशी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचे ओएसडी होते. त्यामुळे त्यांनी हा ताबा कायम ठेवला आहे. आता हे प्रकरण विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात गेले आहे. दहा वर्षांच्या आपल्या मंत्री कालावधीत शासकीय निवासस्थान न घेणाऱ्या नाईक यांच्या माजी ओएसडीला मात्र शासकीय घराचा सोस सोडवत नाही.

जानेवारी १९९६ रोजी सुरू झालेल्या नवी मुंबई पालिकेच्या महत्त्वाकांक्षी परिवहन उपक्रमाचा व्याप अलीकडे मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. सध्या ३६० बसेस असलेल्या या उपक्रमाच्या ताफ्यात वर्षअखेर ५०० बसेस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुर्भे येथील आगारात एकाच ठिकाणी असलेले आगार आणि मुख्यालय यांच्यात ताळमेळ बसेनासा झाला आहे. त्यामुळे लवकरच एनएमएमटीचे मुख्यालय पालिकेच्या बेलापूर येथील जुन्या इमारतीत हलविले जाणार आहे. त्यासाठी त्या इमारतीतील आठव्या मजल्यावरील कार्यालयांची डागडुजी आणि इतर सुविधांवर एक कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मुंबईत प्रवाशांसाठी वाढविलेल्या व्होल्वा बस, राज्य शासनाकडून येणाऱ्या तेजस्विनी बसेस यामुळे एनएमएमटी उपक्रम विविध प्रकारे कात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा या पालिकेच्या स्वयंपूर्ण, स्वावलंबी उपक्रमाचा प्रभारी महाव्यवस्थापक एनएमएमटीचे स्वत:च्या मालकीचे घर असताना इतरत्र भाडय़ाने राहत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या विद्यमान ओएसडीने बळकावलेले हे घर परत मिळावे यासाठी एनएमएमटीने नुकतीच एक तिसरी नोटीस परदेशी यांना दिली आहे. राज्याच्या वित्त विभागातून परदेशी २००६ मध्ये पालिकेत उपायुक्त म्हणून प्रतिनियुक्तीवर आले होते. त्या वेळी त्यांना एनएमएमटी महाव्यवस्थापकाचे हे घर राहण्यास देण्यात आले होते. पाम बीचसारख्या नवी मुंबईतील क्वीन नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गावर सिडकोने वसविलेल्या अनिवासी भारतीय संकुलात एनएमएमटीने २००० मध्ये २२ लाख रुपये खर्च करून सिडकोकडून इमारत क्रमांक २० मधील १००३ सदनिका विकत घेतलेली आहे. सुमारे ११०० चौरस फूट प्रशस्त आणि हवेशीर असलेले हे घर सोडू नये असा मोह कोणालाही होऊ शकतो. तोच मोह परदेशी यांना झाला असून उपायुक्त म्हणून पालिकेच्या उपकर विभागात ‘लक्षवेधी’ कार्य केल्यानंतर त्यांना तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या गोटात स्थान मिळाले. वसई-विरारचे विद्यमान आयुक्त सतीश लोखंडे हे नाईक यांचे त्या वेळी सचिव असल्याने परदेशी यांना तेथे विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्या काळातही परदेशी यांनी ‘विशेष कार्य’ केल्याने नाईक यांना आता विश्रांती घ्यावी लागली. उपायुक्त पदावरून पायउतार झाल्यानंतरही पालकमंत्र्यांचे ओएसडी म्हणून एनएमएमटीच्या महाव्यवस्थापकाचे घर कायम ठेवण्यात परदेशी यशस्वी झाले. पालिकेत असलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाईक सूत्रधार असल्याने त्यांच्या ओएसडीला तेथून बाहेर काढणे एनएमएमटीला शक्य झाले नाही.

राज्यात व पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असल्याने ते शक्य झाले नाही, पण आता राज्यात परिवर्तन होऊन दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे तरी परदेशी यांची गाडी एनएमएमटीच्या आगारातून बाहेर पडण्यास तयार नाही. या वेळी परदेशी यांनी आपण विरोधी पक्षनेते यांचे ओएसडी असल्याचे उपक्रमाला कळविले असून एनआरआयचे घर कायम ठेवण्यात यावे असे स्पष्ट केले आहे. त्याबदल्यात परदेशी यांच्याकडून भाडे घेतले जात आहे.

सध्या परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्याकडे महाव्यवस्थापकाचा प्रभारी पदभार आहे. त्यांनी एनएमएमटीची मालमत्ता खाली करावी यासाठी आतापर्यंत तीन वेळा नोटीस दिली, पण परदेशी यांनी त्याला केराची टोपली दाखवली आहे. एनएमएमटीत लवकरच प्रतिनियुक्तीवर महाव्यवस्थापक येणार आहे. नवीन आयुक्त तुकाराम मुंडे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांना हा कब्जा पचनी पडणारा नाही. जुलै २०११ च्या शासकीय नियमानुसार बदली झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्याने विहित कालावधीत शासकीय घराचा ताबा देणे बंधनकारक आहे.

परदेशी यांना एनएमएमटीच्या घरात राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, पण राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे हा भुजंग गेली आठ वर्षे आलिशान घरात राहत आहे. त्याच्याविरोधात मी अनेक वेळा तक्रार केली आहे. त्यामुळे एनएमएमटीचे आर्थिक नुकसानही होत आहे. याविरोधात आता मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे दाद मागणार आहे.

– सुरेश म्हात्रे, सदस्य, एनएमएमटी