एकाच वेळी इंधन आणि विजेवर चालणारी देशातील पहिली प्रदूषणमुक्त प्रवासी बस नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमात दाखल झाली. लवकरच ही बस पामबीच मार्गावर धावणार आहे. सिंगापूर, हाँगकाँग या अशियाई देशानंतर भारतात दाखल झालेली ही पहिलीच बस आहे. या बसची किंमत दोन कोटी ३० लाख रुपये आहे. यापूर्वीचे एनएमएमटीला बस पुरवठा करणाऱ्या व्होल्वो कंपनीने ही बस बनविली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी महिन्यात नवी दिल्लीत विजेवरील चालणाऱ्या प्रवासी बसचे लोर्कापण केले. केंद्र सरकारच्या जून्या जेएनआरयुएम व विद्यमान अमृत योजनेतील आर्थिक पाठबळावर ही बस घेण्याचा पहिला मान नवी मुंबई परिवहन उपक्रमाला आहे. एनएमएमटीने एकून दोन बसेसेची मागणी केली होती. त्यापैकी एक बस दोन दिवसापूर्वी एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
घरातून मोबाईल चार्ज करुन ज्याप्रमाणे कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडतो त्याप्रमाणे ही बस आगारातून विद्युत चार्जगि करुन रस्त्यावर काढली जाणार आहे. या बसची बॅटरी डिसचार्च झाली तर तिला डिझेल वरही चालविता येणार आहे.
दोन्ही इंधन पद्धतीवर चालणारी ही देशातील पहिलीच प्रवासी बस आहे. या बससाठी जेएनएनआरयुएम व अवज उद्योग मंत्रालयाने अर्थसहाय्य केले आहे. या बसचा लवकरच मार्ग ठरविला जाणार असून नवी मुंबईचा क्वीन निकलेस असलेल्या पामबीच मार्गावर ती फिरवण्याची जास्त शक्यता वर्तविण्यात येत आहे.