नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) येथे कामोठे, कळंबोली, तळोजा औद्योगिक वसाहत आणि पनवेल शहरात बससेवा सूरू केल्या; परंतु या बस मार्गापैकी अनेक मार्गावर हवा तसा प्रतिसाद एनएमएमटीला मिळत नाही, अशी बोंब एकीकडे मारली जात असताना प्रवाशांकडून एनएमएमटीच्या बसथांब्यावर बसच्या वेळांची पाटी नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. या सर्व समस्येवर एका राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीने पुढाकार घेऊन बसथांब्यावर बसच्या वेळ स्वखर्चाने झळकविण्याचा प्रस्ताव एनएमएमटी प्रशासनासमोर मांडला आहे. या व्यक्तीच्या सामाजिक सेवेचे एनएमएमटीने स्वागत केल्याने लवकरच रोडपाली येथील ७१, ५६ या बसथांब्यावर बसच्या वेळा झळकणार आहेत. त्यामुळे सुमारे दोन हजार प्रवाशांना बसच्या वेळा समजतील. रोडपाली प्रमाणे एनएमएमटीच्या प्रत्येक बसथांब्यावर वेळा लिहिलेल्या असाव्यात, अशी मागणी यानिमीत्ताने होत आहे.
सध्या तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जाणारी ७१ क्रमांकाची एनएमएमटीची बस ही विलंबाने येत असल्याने चर्चेचा विषय बनली आहे. ही बस कधी येणार याच्या प्रतिक्षेत प्रवासी असतात मात्र ३० मिनीटांनी एकदा येणारी बस नेकमी कधी येणार याच्या प्रतिक्षेत प्रवासी असतात. बसच्या विलंबामुळे अजूनही तीन आसनी रिक्षाचालक आणि बेकायदा चालणाऱ्या इकोव्हॅनचा आसरा या प्रवाशांना घ्यावा लागतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने पनवेल विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस प्रदीप ठाकूर यांनी पुढाकार घेऊन रोडपाली परिसरातील एनएमएमटीच्या सर्व बसथांब्यावर निश्चित वेळ लिहिणार आहेत.

थिटय़ा हाईटगेजचा अडथळा
बेलापूर रेल्वेस्थानक ते तळोजा औद्योगिक वसाहत या मार्गावर चालणारी ७१ क्रमांकाची बससेवा सूरू करून १५ दिवस उलटूनही ही बससेवा रोडपाली येथील हैद्राबाद स्टेट बँकेकडून सुरू झालेली नाही. उद्घाटनाच्या दिवशी रोडपाली येथील रहिवाशांनी सेक्टर २० मधून ही बस सुरू करावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ही बससेवा या मार्गावरून सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हैद्राबाद बँकेजवळ सिडकोने अवजड वाहने शहरात शिरू नये, म्हणून आडवा येत असलेला हाईटगेजची उंची वाढविण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संतोष ठाकूर यांनी केली आहे. सध्या ही बस रोडपाली येथील पुरूषार्थ पेट्रोलपंपाच्या शेजारून वळसा घेऊन सेक्टर १७ येथील मनिषा पॅरेडाईस इमारतीकडून डीमार्टकडे जाते.