21 November 2019

News Flash

‘एनएमएमटी’चे चाक गाळात?

बंगळूरु येथील परिवहन उपक्रमाचा आदर्श सर्व देशातील उपक्रमांना सांगितला जात होता

|| विकास महाडिक

बंगळूरु येथील परिवहन उपक्रमाचा आदर्श सर्व देशातील उपक्रमांना सांगितला जात होता, पण त्या उपक्रमाची चाकेदेखील आता हळूहळू निखळू लागली आहेत. देशातील कोणताही परिवहन उपक्रम हा फायद्यात नाही. ‘बेस्ट’ उपक्रमाला तिकीट दर कमी करून  प्रवासी संख्या वाढवण्याची वेळ आली आहे. ‘बेस्ट’ची ही स्थिती असेल तर आजूबाजूच्या शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोणत्या संकटातून जात आहेत, याची कल्पनाच केलेली बरी. ‘एनएमएमटी’ही तोटय़ात असून महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून आहे.

नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमातील दोन गाडय़ांची चाके मागील आठवडय़ात भर रस्त्यात निखळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे हा एक किरकोळ अपघात मानला गेला. चालत्या गाडीचं चाक भर रस्त्यात निखळणे हा प्रकार उपक्रमाचा प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे, ते दर्शवणारा आहे. देशातील कोणताही परिवहन उपक्रम हा फायद्यात नाही. बंगळूरु येथील परिवहन उपक्रमाचा आदर्श सर्व देशातील उपक्रमांना सांगितला जात होता, पण त्या उपक्रमाची चाकेदेखील आता हळूहळू निखळू लागली आहेत.

‘बेस्ट’ने तर शेवटच्या घटका मोजण्यास सुरुवात केली आहे. ‘बेस्ट’ टिकवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून अखेर स्पर्धात्मक युगात तिकीट दर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जे यापूर्वी कधी घडले नव्हते. प्रगत परदेशांतील नागरिक सार्वजनिक परिवहनचा सर्वाधिक वापर करतात. तेथील खासगी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे दर जास्त असल्याने नागरिकांचा सरकारी व्यवस्थेवर जास्त भरवसा आहे. त्याचप्रमाणे वाहनतळाचा खर्च देखील खिशाला चाट देणारा असल्याने नागरिक सार्वजनिक वाहतुकीकडे वळत असल्याचे दिसून येते. तेथील सार्वजनिक व्यवस्थेच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नच नाही. ‘बेस्ट’ने कमी तिकीट दर करून प्रवासी संख्या वाढवली, मात्र खर्च घटल्याने तोटय़ात आणखी भर पडली आहे. देशातील एका सर्वात जुन्या व सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची ही स्थिती असेल, तर आजूबाजूच्या शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोणत्या संकटातून जात आहेत, याची कल्पना केलेलीच बरी.

‘एनएमएमटी’चे परिचालन तुलनेने उत्तम सुरू आहे. माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात कार्यान्वित झालेली ‘इंटीग्रेटेट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) ‘एनएमएमटी’ला संजीवनी देणारी ठरली आहे. आगारातून गाडी कधी निघाली, कुठे गेली, किती वेग, कोणता चालक, कोणता वाहक, किती बस स्थानके थांबली, किती न घेता गेली, किती तिकिटे फाडली, किती उत्पन्न झाले, किती वेळात पोहचली, या सर्व प्रश्नांची उत्तरे एका नियंत्रण कक्षात आज मिळत आहेत. प्रवाशांच्या तक्रारी आल्यास वाहक-चालक यांना समज एका क्षणात दिली जात आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याच उपक्रमाने न केलेली उपाययोजना ‘एनएमएमटी’ने केल्याने उपक्रमाची गाडी काही अपवाद वगळता अद्याप योग्य मार्गावर आहे. उपक्रमाने मुंबईत वातानुकूलित गाडय़ा वेळेवर सोडल्याने शहरातील दोन हजार खासगी वाहने मुंबईत जाणे बंद झाली. चार दिवसापूर्वी पालिकेला अलविदा करावे लागलेले आयुक्त रामास्वामी यांनी या उपक्रमाला चालना दिली. त्यामुळे उपक्रमातील गाडय़ांची वाढ दरवर्षी होत असून आता ४९० बस ताफ्यात आहेत. ‘एमएमआरडीए’ क्षेत्रातील जास्तीत जास्त भागात पोहचताना ७४ मार्गावर ‘एनएमएमटी’ सेवा देत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व शहरांपेक्षा नवी मुंबईची ही सेवा तोटय़ातून बाहेर पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी वाशी येथील बस डेपोचा वाणिज्य वापर हा ‘एनएमएमटी’ला तारणारा ठरणार आहे. वर्षांला ४२ ते ४३ कोटी रुपये ‘एनएमएमटी’च्या तिजोरीत जमा होणार आहेत. याशिवाय पनवेल पालिकेला अतिरिक्त सेवा आणि मुंबईतील फेऱ्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्या कल्पक संकल्पनेतून उपक्रमाला आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आरदवाड गेली अनेक वर्षे या उपक्रमाची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नातून आलेली आयटीएमएस प्रणाली उपक्रमातील उणिवा शोधून त्यावर उपाययोजना करण्यास पूरक ठरत आहे. उत्पन्नाची नवनवीन दालने शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाढणारी डिझेलची दरवाढ अनेक सार्वजनिक उपक्रमांना मारक ठरत आहे. त्यात रोजगाराच्या नावाखाली टॅक्सी, रिक्षाचालकांना वाटण्यात येणारी परवान्याची खैरात सार्वजनिक उपक्रमांचा गळा घोटत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम झाल्यास रस्त्यावर उतरणारी वाहनांची संख्या कमी होऊ शकते. हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाहतुकीचा संर्पूण खेळखंडोबा होण्याअगोदर सार्वजनिक वाहतूक सेवेची चाके निखळणार नाहीत, याची काळजी सर्वानीच घेण्याची गरज आहे.

First Published on July 23, 2019 2:31 am

Web Title: nmmt navi mumbai municipal corporation mpg 94
Just Now!
X