|| संतोष जाधव

रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंतच्या प्रवासासाठी अतिरिक्त २ रुपये; वर्षभरानंतर अंमलबजावणी

एनएमएमटीला आर्थिक तोटय़ातून सावरण्यासाठी परिवहन प्रशासन आता कुठे झोपेतून जागे होत आहे. हद्दीबाहेरील ज्येष्ठ व अपंगांची सवलत बंद केल्यानंतर वर्षभरापूर्वी केलेल्या प्रस्तावाची आठवण आली आहे.  सप्टेंबर २०१७ रोजी केलेल्या ठरावानुसार आता प्रवाशांच्या खिशातून रात्रीच्या प्रवासासाठी असेल त्या तिकिटापेक्षा २ रुपये अतिरिक्त घेण्यास १ ऑक्टोबरपासून सुरुवात केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या तिकीट दरात सवलत तर अपंगांना मोफत प्रवासाला एनएमएमटी प्रशासनाने आधीच कात्री लावली असताना आता रात्रीच्या प्रवासासाठी अतिरिक्त २ रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत.

सातत्याने होत असलेल्या इंधनवाढीमुळे दिवसेंदिवस एनएमएमटीचा तोटा वाढत आहे. एनएमएमटीला दररोज ५ लाख तर महिन्याला सुमारे दीड कोटी तोटा होत आहे. पावसाळ्यामध्ये शीव-पनवेल महामार्गाची दुरवस्था तर खड्डय़ांमुळे विविध मार्गावर गाडय़ा बंद पडण्याच्या परिणामामुळे एनएमएमटीचा तोटा महिन्याला चार कोटींवर गेला आहे. त्यामुळे परिवहन प्रशासनाची चिंता वाढली आहे.

अपंगांच्या सवलतीबाबत परिवहन उपक्रमाचा आंधळा कारभार समोर आल्यानंतर पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी प्रस्तावात नसताना तिकीटदरात दिली जात असलेली सवलत १ ऑक्टोबरपासूनच बंद केली आहे.

परिवहन उपक्रम चालवण्यासाठी दर महिन्याला पालिकेकडे हातपाय पसरावे लागत आहेत. एकीकडे सतत वाढत जाणारे तेलांचे भाव यामुळे एनएमएमटीचे कंबरडे मोडले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात एकूण ४८५ बसगाडय़ा असून त्यातील ४५० बसगाडय़ा मुंबई, कल्याण-डोंबिवली, उरण, पनवेल, भिवंडी, बदलापूर अशा पालिकाक्षेत्राबाहेरील भागात धावतात. पालिकेचे महिन्याचे उत्पन्न १० कोटी व खर्च १३.५० ते १४ कोटी होत असल्याने सातत्याने ही सेवा डळमळीत होण्याच्या मार्गावर असल्याने आर्थिक उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. २० मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार रात्री ११ ते ५ यावेळेत बसेस सोडल्या जातात. त्यामुळे या वीस मार्गावरील बसेसने प्रवास करताना असलेल्या तिकिटापेक्षा २ रुपये अधिक मोजावे लागत आहेत.

पालिका परिवहन उपक्रमाचा तोटा पावसाळ्यातील रस्त्यांच्या स्थितीमुळे वाढला आहे. तो कमी करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. त्यामुळे रात्री ११ ते ५ वेळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सरसकट अतिरिक्त २ रुपये आकारणी मंजूर ठरावानुसारच १ ऑक्टोंबरपासूनच सुरू करण्यात आली आहे.    – शिरीष आदरवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी

पालिका परिवहन उपक्रमात सातत्याने आर्थिक स्थिती ढासळत असताना विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु गेल्या वर्षी मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी यावर्षी केली जात आहे.  प्रशासनाने योग्य वेळी काळजी घेणे आवश्यक आहे.    – समीर बागवान, परिवहन सदस्य