20 January 2019

News Flash

एनएमएमटीची अ‍ॅपआधारित टॅक्सीसेवा

अर्थसंकल्पात ठोक वेतनावरील सुमारे १८० कामगारांना कायम करण्याच्या सूचनेला मंजुरी देण्यात आली

प्रतिनिधिक छायाचित्र

नवी मुंबई परिवहनच्या अर्थसंकल्पात तरतूद

ओला, उबर कंपनीच्या धर्तीवर एनएमएमटीदेखील अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवा देणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून चार लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे. अ‍ॅप तयार केले जाणार आहे, अशी माहिती सभापती प्रदीप गवस यांनी दिली. नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

अर्थसंकल्पात ठोक वेतनावरील सुमारे १८० कामगारांना कायम करण्याच्या सूचनेला मंजुरी देण्यात आली.  १० तेजस्विनी बस महिलांसाठी महिला चालविणार आहेत. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात गतवर्षीच्या तुलनेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत ३४६ कोटी ४ लाख ९९ हजार जमा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा ३४६ कोटी ११ लाख ७४ हजार रुपये खर्च सादर करण्यात आला आहे. १० लाख ७५ हजार शिलकीच्या या अर्थसंकल्पात यंदा वाशी डेपोमध्ये वाणिज्य संकुल उभारण्यासाठी ७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्कूल बस आणि कंपन्यांना बस सुविधा पुरविण्यासाठीदेखील तरतूद आहे, अशी माहिती सभापती प्रदीप गवस यांनी दिली. इलेक्ट्रिक बससाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही

तरतूद आणखी १० कोटी रुपयांनी वाढविल्याने आता इलेक्ट्रिक बससाठी २० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यापूर्वी मनपाने १४३ कोटी रुपये अनुदान दिले होते. या अनुदानामध्ये वाढ करून यंदा १५२ कोटी रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. सीबीडी, तुर्भे, ऐरोली बस आगार आणि स्थानकाच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कामगारांच्या वेतनश्रेणीमध्ये वाढ करण्याबरोबर भविष्य निर्वाह निधी प्रोत्साहन भत्तादेखील वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. आता हा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. या बैठकीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून अंतिम मंजुरी मासिक सभेमध्ये घेण्यात येणार आहे.

५० पैसे ते १ रुपया भाडेवाढ?

१५ किलोमीटर नंतर बसभाडे प्रत्येकी ५० पैसे ते एक रुपयाने वाढविण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे एनएमएमटीच्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

First Published on February 6, 2018 1:54 am

Web Title: nmmt start app based taxi service