१२ मार्गावर उद्यापासून शंभर फेऱ्यांत वाढ

नवी मुंबई : टाळेबंदी शिथिलीकरणानंतर आता शहरातील सर्वच व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. मात्र लोकल बंद असल्याने शहरांतील सार्वजनिक वाहतुकीचा ताण ‘एनएमएमटी’च्या बसवर येत आहे. यात महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन प्रशासनाने १ ऑक्टोबरपासून खास महिलांसाठी  बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. शहर आणि शहराबाहेरील १२ मार्गावर गर्दीच्या वेळी या बस धावणार आहेत.

करोनाकाळात टाळेबंदी असल्याने ‘एनएमएमटी’च्या बस बंद होत्या. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू होती. राज्य सरकारने ‘पुन्हा सुरुवात’ करीत हळहळू सर्व खुले केले आहे. त्यामुळे आता नागरिक घराबाहेर पडत आहेत. शहरासह इतर ठिकाणी प्रवास सुरू झाला आहे. मात्र सार्वजनिक वाहतुकीसाठी मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल मात्र अद्याप बंद आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक ही बेस्ट, एनएमएमटीवर अवलंबून आहे. मात्र बसला मोठी गर्दी होत आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी बसमध्ये एका आसनावर एकच प्रवासी बसण्यास मुभा आहे.  एनएमएमटी बसमध्ये महिलांसाठी आठ आसने आरक्षित आहेत. त्यात एका आसनावर एकच महिला प्रवासी बसत असल्याने एका बसमध्ये फक्त चार महिलांना आसन मिळत आहे. त्यामुळे प्रतीक्षा केल्यानंतर बसमध्ये प्रवेश मिळत असून उभे राहून प्रवास करावा लागत आहे. याचा महिला प्रवाशांना त्रास होत आहे.

यामुळे नवी मुंबई परिवहन उपक्रमाने गर्दीच्या वेळी खास महिलांसाठी महिला विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्वीही महिलांसाठी तेजस्विनी बस होती. मात्र अपेक्षित प्रवासी महिलांचा प्रतिसाद न मिळण्याने ती बंद करण्यात आली होती. मात्र आता या बसला प्रतिसाद मिळेल व महिला प्रवाशांना यामुळे दिलासा मिळेल.

‘अनलॉक’ ५ आता १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे बंद असलेल्या आणखी आस्थापनाही सुरू होतील. त्यामुळे प्रवाशांची गर्दी आणखी वाढेल. यात महिलांची संख्याही लक्षणीय असणार आहे. त्यामुळे महिलांसाठी  विशेष बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे परिवहन समिती सदस्य समीर बागवान यांनी सांगितले.

महिला प्रवाशांना दिलासा

या मार्गावर महिला विशेष बस अकरा मार्गावर एनएमएमटीची महिला विशेष बस धावणार आहे. ११ पैकी ७ मार्ग हे नवी मुंबईबाहेरील आहेत.

* नवी मुंबई शहर : ९,२०,२२,५०,१

* नवी मुंबई ते ठाणे :  ७, ८, ४

* नवी मुंबई ते डोंबिवली : ४१

* नवी मुंबई ते कल्याण :  ६०, ६१ आणि ६२

वाशी डेपो आणि वाशी स्टेशन या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीत महिला प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे महिलांसाठी गर्दीच्या वेळी सकाळी ५० आणि सायंकाळी ५० अशा १०० फेऱ्या वाढवण्यात येत आहेत.

-शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी