‘बेस्ट’ भाडेकपातीनंतर महिनाभरात दीड कोटींचा फटका; २० ते २५ हजार प्रवासी घटले

मुंबई महापालिकेच्या ‘बेस्ट’ उपक्रमाच्या भाडेकपातीचा परिणाम नवी मुंबई महापालिकेच्या ‘एनएमएमटी’च्या सेवेवर होत असून दिवसेंदिवस आर्थिक तोटा वाढत आहे. ‘एनएमएमटी’चे दिवसाला २० ते २५ हजार प्रवासी घटले असून महिनाभरात दीड कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. आता पासधारकांनीही पाठ फिरवल्याचे दिसत आहे. ७० हजार असलेल्या पासधारकांची संख्या आता ३५ हजारापर्यंत आली आहे.

नवी मुंबई परिवहन उपक्रमही तोटय़ात सुरू आहे. यातून बाहेर येण्यासाठी नवी मुंबई पालिका प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आखत असतानाच ‘बेस्ट’चा भाडेकपातीचा निर्णय झाला. यामुळे एनएमएमटी उपक्रमावर याचे गंभीर परिणाम होत आहेत. एनएमएमटीला दिवसागणिक सरासरी ३ ते ३.५ लाखाचा तोटा सहन करावा लागत आहे. महिनाभरात परिवहन उपक्रमाचे दिवसाला २० ते २५ हजार प्रवासी घटले असून १ ते दीड कोटीचे उत्पन्न घटले आहे.

‘बेस्ट’ने ९ जुलैपासून  भाडेकपातीची अंमलबजावणी केली होती. पासधारक हे महिन्याच्या १ तारखेला पास काढत असून गेल्या जुलै महिन्यात ‘एनएमएमटी’च्या पासधारकांनी पास काढले होते. परंतु ऑगस्ट महिन्यात १ तारखेलाच पास विक्रीतून ४.५ लाख ते ५ लाख जमा होतात ते उत्पन्न या महिन्यात १.५० लाखावर आले आहे. पासधारकांची संख्य ७० हजारावरून ३३ ते ३५ हजारावर आली आहे. ‘एनएमएमटी’चे दररोज साधारणपणे २ लाख १० हजार प्रवासी होते. यातील जुलै महिन्यात दिवसाला २० ते २५ हजार प्रवासी घटले आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे एनएमएमटीला अनुदानासाठी पालिकेकडे आणखी हात पसरावे लागणार आहेत. पालिकेकडून महिन्याला पाच कोटी अनुदान मिळते.

सध्या एनएमएमटीच्या साधारण बसला पाच किलोमीटरच्या टप्प्यातील प्रवासासाठी ११रुपये तर २० किलोमीटर पुढील टप्प्यासाठी २३ रुपये तिकीटदर आहेत. त्याउलट ‘बेस्ट’ने पहिल्या ५ किमीसाठी ५ रुपये तिकीटदर ठेवला आहे. त्यामुळे प्रवासी ‘बेस्ट’ला पसंती देत आहेत.

९ जुलैपासून तिकीटदर कपात केल्यामुळे ‘बेस्ट’चे प्रवासी वाढले आहेत. नवी मुंबईतूनही बेस्टला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ‘बेस्ट’चे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोमाने यांनी सांगितले.

‘बेस्ट’ तिकीटदरात केलेल्या कपातीमुळे ‘एनएमएमटीचे’ पासधारकही कमी होत आहेत. उपक्रमाची मी नुकतीच भेट घेत माहिती घेतली आहे. आठ दिवसात याबाबत विचारविनिमय करण्यात येईल. तसेच उत्पन्न वाढविण्याबाबत योग्य उपाययोजना करण्यात येतील.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका