नवी मुंबई : करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने ब्रेक द चेन या आदेशानुसार शासकीय कार्यालयात अभ्यागताना प्रवेशबंदी केली असून सिडकोने ५ एप्रिलपासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे सिडकोचे बेलापूर येथील मुख्यालय सिडको भवन, दुसरे कार्यालय रायगड भवन व मुंबई तसेच प्रत्येक नोडमधील विभाग कार्यालयात अभ्यागतांना प्रवेशबंदी राहणार आहे. पुढील आदेश होईपर्यंत ही प्रवेशबंदी राहणार असून केवळ ई-व्हिजिटर्सद्वारे भेटता येणार आहे. याशिवाय नागरिकांनी पत्रव्यवहार, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई-मेल मेसेज या प्रणालींचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिडकोचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्याचबरोबर दक्षिण भागातील सेवा-सुविधांची सिडकोकडे जबाबदारी आहे. साडेबारा टक्के  व विमानतळ प्रकल्पग्रस्त सिडको कार्यालयात वारंवार भेटी देत असतात. राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी उपस्थिती अर्धी व अभ्यागतांना

बंदी घातली आहे. करोना रुग्णांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याला नवी मुंबई अपवाद नाही. त्यामुळे सिडकोत होणारी दैनंदिन गर्दी टाळता यावी यासाठी सिडकोने काही विशेष उपाययोजना केलेल्या आहेत. त्यात अभ्यागतांना प्रवेशबंदी सर्वच कार्यालयांसाठी करण्यात आली असून आधुनिक डिजिटल यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. यात ई-व्हिजिटर्स ही प्रणाली विकसित करण्यात आली असून या प्रणालीद्वारे सिडकोतील अधिकाऱ्यांना भेटता येईल, असा दावा सिडकोने केला आहे. नागरिकांसाठी ०२२६७९१८१०० हे हेल्पलाइनदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.