परवानगी न मिळाल्याने यंदाही स्वच्छता नाही

नवी मुंबई : पावसाळ्यात सुमद्राच्या मोठय़ा भरतीच्या काळातही शहरात पाणी न तुंबण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असलेले धारण तलाव वर्षांनुवर्षे गाळ न काढल्याने गाळात रुतल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापनाची परवानगी मिळत नसल्याने हा प्रश्न दरवर्षी गंभीर होत असल्याने शहराला पुराचा धोका वाढला आहे.

समुद्राच्या भरती रेषेपेक्षा नवी मुंबई शहराची भूपातळी ४.२० मीटर खाली असल्याने डच पद्धतीचे धारण तलावांची निर्मिती सिडकोने शहर वसवताना केली आहे. त्यामुळे भरतीचे पाणी शहरात न शिरता धारण तलावामध्ये साठविले जाते व ओहोटीच्या वेळी सदर पाणी पुन्हा खाडीत परत जाते. यासाठी स्वयंचलित फ्लॅप दरवाजेही लावण्यात आले आहेत. शहरात असे ११ धारण तालव आहेत. मात्र या ठिकाणी खारफुटीची वाढ झाल्यामुळे तलावांमध्ये गाळ साचला आहे. त्यामुळे पुराच्या पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येत आहेत. अलीकडे पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचण्याचे व भरतीच्या वेळी शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोकाही वाढला आहे.

या धारण तलावांची स्वच्छता (गाळ काढणे) गरजेचे आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापनाची परवानगी मागितली आहे. मात्र ती मिळत नसल्यामुळे ही स्वच्छता होत नसल्याने हा प्रश्न गंभीर होत आहे. धारण तलावात आलेल्या खारफुटी, कांदळवनामुळे तेथील गाळ काढण्यात आलेला नाही. गाळ आणि खारफुटीने भरल्यामुळे याठिकाणी नेहमीच उग्र वास येत असतो. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. याचा प्रत्यय मागील दोन वर्षांपासून येत आहे. महापालिकेने महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडे परवानगीकरिता अर्ज केला आहे. मात्र करोनामुळे याबाबत बैठका होत नसून अद्याप त्यासाठी मान्यता मिळाली नाही. त्यामुळे यावर्षीही हे धारण तलावांची स्वच्छता होणार नाही असे दिसत आहे.

धारण तलावांची स्वच्छता करण्यात येणार आहे. मात्र अडथळा ठरणाऱ्या कांदळवनांमुळे ती काढण्यासाठी महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणकडे परवानगी मागण्यात आली आहे, मात्र ती अद्याप मिळालेली नाही. ती परवानगी मिळताच स्वच्छता करण्यात येईल.

– संजय देसाई,

शहर अभियंता, महानगरपालिका.