नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात येणार आहे. मंगळवारी होणाऱ्या महासभेत मुंढेंच्या विरोधात अविश्वास ठराव आणला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, भाजप या ठरावाच्या बाजूने असल्याची माहिती समोर येते आहे.

आयुक्त तुकाराम मुंढें यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर १४ नगरसेवकांच्या सह्या आहेत. यामध्ये सर्वपक्षीय नगरसेवक असल्याने मुंढे यांच्या विरोधात वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळते आहे. मुंढे यांच्या विरोधातील प्रस्ताव सचिवांकडे पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंगळवारी महासभेत मांडण्यात येईल.

चार महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे नवी मुंबईचे पालिका आयुक्त म्हणून रूजू झाले. कडक शिस्तीचे आणि नियमानुसार काम करणारे आयुक्त ही मुंढेंची ओळख आहे. मुंढेंच्या कार्यशैलीमुळे त्यांचे पालिकेतील अनेक नगरसेवकांसोबत मतभेद आहेत. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि मुंढे यांच्यातला संघर्ष बराच गाजला. मात्र दोनच दिवसांपूर्वी मुंढेंनी म्हात्रे यांना चहापानाचे निमंत्रण देत संघर्ष कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता नगरसेवक विरुद्ध आयुक्त हा संघर्ष वाढताना दिसतो आहे.

आयुक्त मुंढे आणि महापौर सुधाकर सोनावणे यांच्यातही मोठा वाद आहे. नागरी कामांसाठी संवाद साधला जात नाही तोपर्यंत पालिकेत पाऊल ठेवणार नाही, अशी भूमिका महापौर सुधाकर सोनावणे यांनी घेतली होती. त्यामुळे तुकाराम मुंढेंनी महापौर सोनावणे आणि आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये १११ नगरसेवक आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३, शिवसेनेचे ३७, काँग्रेसचे १०, भाजपचे ६ तर १ अपक्ष नगरसेवक आहे.