सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलिसांनी बोलाविलेल्या बैठकीमध्ये आम्ही गोहत्या करणार नसल्याचे आश्वासन पनवेल शहरातील अकरा मशिदींच्या मुख्य विश्वस्तांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यात पोलिसांना दिले. बकरी ईदच्या पाश्र्वभूमीवर ही बैठक झाली. राज्य सरकारने यापूर्वीच राज्यभर गोवंशहत्या बंदी कायदा लागू केला आहे.
सामाजिक सलोखा जपण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील विविध धर्माच्या प्रमुखांना कायद्याचे पालन करण्याची विनंती करा, असे आदेश नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे आणि सहायक पोलीस आयुक्त एस. बी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनामुळे पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी यापूर्वी अशाच बैठकींचे आयोजन करून शहरातील मशिदींतून सकाळच्या अजानदरम्यान वाजणाऱ्या भोंग्यांचा आवाज कमी करण्यात यश मिळविले. त्यानंतर भोसले यांनी रस्त्यावर होणाऱ्या नमाजपठणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये याकूब बेग मशिदीच्या विश्वस्तांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले यांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यात शहरातील ११ मशीद व मदरशांच्या प्रमुख विश्वस्तांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये गोवंश हत्या रोखण्यासाठी कायद्याचे पालन करण्याची विनंती केल्यावर या मंडळींनी गोवंश हत्या करणार नाही, असे कबूल केले. शासनमान्य जे मांस उपलब्ध आहे, तेच आम्ही खाऊ असे या विश्वस्तांनी सांगितले. त्यामुळे यंदाच्या बकरी ईदमध्ये बकरी व मेंढय़ाचे मटन मोठय़ा प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. दहीहंडीच्या दिवशी तळोजा गावामध्ये गोवंश हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस पनवेल तालुक्यामध्ये कुठेही गोवंश हत्या होऊ नये यासाठी सतर्क झाले आहेत. पनवेल शहरात यापूर्वी चार ठिकाणी जनावरांची कत्तल होत होती. मात्र गोवंश हत्येचा प्रभावी कायदा आल्यानंतर ते कत्तलखाने बंद झाले. शहराच्या प्रवेशद्वाराच्या विविध ठिकाणी कायद्याने बंदी असलेल्या मांसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची पाळत आहे.