नवी मुंबईतील कामोठे या ठिकाणी दहा वर्षात कोणताही विकास झालेला नाही. कामोठे येथील सेक्टर ३६ भागात आजही जनता पाणी, खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छतागृह, सुसज्ज उद्यानं, मोकळे फूटपाथ या सगळ्यांपासून वंचित आहे. यापैकी कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे यंदा विकास नाही तर मत नाही अशी भूमिका कामोठे येथील नागरिकांनी घेतली आहे. रविवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सेक्टर ३६ या ठिकाणी मोकळ्या मैदानात जमून नो डेव्हलपमेंट नो व्होट या मोहिमेला पाठिंबा दर्शवला.

खरंतर या मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून सेक्टर ३६ मधल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र नागरिकांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आलं. समस्यांचं निराकरण न झाल्यास पुढे येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या अभियानात सेक्टर ३६ मधील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी तसेच रहिवासीही उपस्थित होते. ही एक बिगर राजकीय चळवळ असून कोणत्याही उमेदवाराच्या समर्थनार्थ किंवा विरोधात नाही असेही स्पष्ट करण्यात आले.