बेलापूर पालिका रुग्णालयातील स्थिती; माताबाल रुग्णालयासाठी हालचाली

नवी मुंबई नवी मुंबईतील आरोग्य सेवा अजूनही पूर्वपदावर आल्याचे दिसत नाही. बेलापूर येथील माताबाल रुग्णालयात वैद्यकीय साधनसामग्री मिळाली, पण डॉक्टरच नाहीत, अशी स्थिती आहे. गेली पाच वर्षे हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार याची प्रतीक्षा रुग्णांना कायम आहे.

बेलापूर येथे पालिकेने सन २०१४ मध्ये सुसज्ज अशी इमारत बांधून माताबाल रुग्णालय सुरू केले आहे. मात्र कधी वैद्यकीय उपकरणे, तर कधी डॉक्टरांची कमतरता हे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे तीनमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर केवळ बाह्य़रुग्ण तपासणी केली जात आहे.

या ठिकाणी ५० खाटांचे माताबाल रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. हे माताबाल रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री मिळाली आहे. दुसऱ्या मजल्यावर ५० खाटांची सुविधा केली आहे. तसेच नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग व १५ खाटा उपलब्ध आहेत. शस्त्रक्रिया विभाग यासाठीची आवश्यक यंत्रसामग्री रुग्णालयाला मिळाली आहे. एक अ‍ॅम्ब्युलन्सही आहे. मात्र डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे ते पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. थेट डॉक्टरभरतीत ९१६ अर्ज प्राप्त

काही महिन्यांपासून पालिका रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत आहे. डॉक्टरांअभावी अडचणी निर्माण होत असल्याने तत्कालीन आयुक्तांनी थेट भरती प्रक्रिया राबवून राज्यभरात भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्यातून ९१६ अर्ज प्राप्त झाले आहेत. छाननी प्रक्रिया सुरू आहे. ही छाननी झाल्यानंतर मुलाखती घेतल्या जाणार असल्याचे प्रशासन विभागाने सांगितले.

थेट डॉक्टरभरतीसाठी वृत्तपत्रात जाहिराती दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासन विभागाकडे प्राप्त अर्जाची छाननी सुरू असून लवकरच मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

– दयानंद कटके, वैद्यकीय अधिकारी, पालिका