विमानतळ बांधकामासाठीचे स्फोट, तळोजा औद्योगिक वसाहतीचा परिणाम

नवी मुंबई नवी मुंबईतील प्रदूषणात वाढ झाल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत दिली आहे, मात्र हे प्रदूषण प्रत्यक्ष नवी मुंबई शहरातील नसून पनवेल आणि उरण परिसरातील आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात येणारे सुरुंग स्फोट आणि तळोजा येथील कारखाने याला कारणीभूत आहेत, नवी मुंबई पालिका क्षेत्रातील प्रदूषणाच्या पातळीत घट झाली आहे, असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
Submerged area of proposed Poshir Dam soil survey to start soon
प्रस्तावित पोशीर धरणाच्या बुडित क्षेत्र, माती सर्वेक्षणाला लवकरच प्रारंभ
Navi Mumbai
नवी मुंबई : एमएमआरडीएच्या नवनगर निर्मितीमुळे १२४ गावे उद्ध्वस्त होण्याची भीती

२४ तास धडधडणाऱ्या दगडखाणी, शीव-पनवेल व ठाणे-बेलापूर मार्गावर वाढलेली प्रचंड वाहतूक, तळोजा येथील रासायनिक कारखान्यांची हलगर्जी आणि नवी मुंबई विमानतळाच्या बांधकामासाठी होणारे सुरुंग स्फोट यामुळे महामुंबईच्या प्रदूषण पातळीत कमालीची वाढ झाली आहे. देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे विमानतळामुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या औद्योगिक नगरीतून २९ टक्के रासायनिक वायू हवेत सोडले जात असल्याचे पर्यावरणमंत्र्यांनी सांगितले. पालिका क्षेत्रात रासायनिक औद्योगिक कारखान्यांचे प्रमाण कमी झाले असून या कारखान्यांची जागा आयटी कार्यालयांनी घेतली आहे. नोसिल, पील, स्टॅण्डर्ड अल्कलीसारखे मोठे रासायनिक कारखाने बंद झाल्याने त्यांना कच्चा माल पुरवणाऱ्या छोटय़ा कारखान्यांनीही गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी रासायनिक औद्योगिक नगरी असलेले नवी मुंबई पालिका क्षेत्र आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे केंद्र म्हणून उदयाला आले आहे. त्यामुळे या भागातील प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे. शहराच्या पूर्वेला असलेल्या २०० दगडखाणींपैकी ९० टक्के खाणी बंद पडल्या आहेत. ठाणे-बेलापूर व शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी देखील या शहरातील प्रदूषणाला कारणीभूत ठरत होती, मात्र शीव-पनवेल महामार्गाचे काँक्रीटीकरण व ठाणे-बेलापूर मार्गावरील दोन उड्डाणपूल व एका भुयारी मार्गामुळे प्रदूषण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील प्रदूषणाला कारणीभूत घटक कमी झाले असले तरी पीएम २ (सूक्ष्म कण) आणि कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण जास्त आहे. पालिका हे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. या महिन्यात पालिकेचा प्रदूषण अहवाल प्रकाशित होणार आहे. त्यात उपाययोजनाही सुचवण्यात येणार आहेत.

दिवा ते दिवाळे या १०५ किलोमीटर क्षेत्रफळात प्रदूषणाचे प्रमाण कमी होत असताना सिडकोच्या नवी मुंबईचा एक भाग असलेल्या तळोजा एमआयडीसी व उरण क्षेत्रात प्रदूषणाची केंद्रे तयार झाली आहेत. यात तळोजा एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांचा मोठा वाटा आहे. पावसाळ्यातील आद्र्रता व हिवाळ्यातील थंडीचा गैरफायदा घेत या कंपन्या मोठय़ा प्रमाणात वायू आणि जलप्रदूषण करत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. जल व वायू प्रदूषणास कारणीभूत असलेल्या आठ रासायनिक कारखान्यांना राज्य प्रदूषण नियंत्रण केंद्राने अलीकडेच नोटिसा बजावल्या आहेत. तळोजा, कळंबोली आणि पनवेल हा भाग प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. याच भागातून जुना मुंब्रा-पनवेल महामार्ग जातो. त्यावरून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहने ये-जा करतात. त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे.

जून २०१८ पासून नवी मुंबई विमानतळ पूर्व कामे सुरू झाली आहेत. उलवा टेकडीची उंची कमी करण्यासाठी सुरुंग स्फोट करण्यात येत आहेत. ही उंची कमी करताना २५ ते ३० हजार स्फोट केले जाणार आहेत. त्यातून तीन लाख कोटींपेक्षा जास्त माती बाहेर पडणार आहे. माती आणि धुलिकणांमुळे महामुंबई (नवी मुंबई नाही) क्षेत्रातील प्रदूषणात वाढ होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. याकडे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रायगड विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. दक्षिण नवी मुंबई क्षेत्रातील या प्रदूषणामुळे नवी मुंबईतील प्रदूषण पातळीत वाढ असा प्रसार केला जात आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील हवेतील प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे. दगडखाणी बऱ्याच अंशी बंद झाल्या असून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. येथील रासायनिक कारखान्यांचे प्रमाणही कमी झाले आहे.

– सुबोध मुळये, उपअभियंता, पर्यावरण विभाग, नमुंमपा

तळोजा एमआयडीसीतील २० कारखान्यांना नोटीस बजावण्यात आल्या असून १८ कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राहुल मोते, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ