ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर सिडकोने ऐसपैस रेल्वे स्थानके उभारली आहेत. मात्र, वाशी, जुईनगर, रबाळे, सानपाडा या रेल्वे स्थानकांत अपंग प्रवाशांसाठी स्वतंत्र जिने नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. अपंगांसाठी विशेष जिने उभारण्यासंबंधी नियम असूनही सिडकोचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
दररोज ४० हजारांहून अधिक प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या रबाळे, वाशी, सानपाडा, जुईनगर या रेल्वे स्थानकांत अपंगांची गैरसोय होते. वाशी, रबाळे, सानपाडा येथून तीन ते चार हजार अपंग प्रवासी प्रवास करतात. अपंगांसाठी हार्बर मार्गावर ऐरोली, कोपरखरणे, सीबीडी अशा काही स्थानकांवर स्वतंत्र जिने आहेत. त्यामुळे अपंगांना रेल्वे पकडण्यासाठी तसेच इच्छित स्थळी जाण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. मात्र अन्य स्थानकांत अशी सुविधा नसल्याने अपंग प्रवाशांचे हाल होतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी असणाऱ्या जिन्यांवरूनच इतरांचे सहकार्य घेऊन अपंगांना रेल्वे पकडण्यासाठी फलाटावर जावे लागते. अपंगांनी स्वतंत्र जिन्यांची वेळोवेळी मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

रस्ता, रेल्वे ओलांडताना अपंग प्रवाशांचे हाल
नवी मुंबईत ठाणे-बेलापूर मार्गावर तसेच अंतर्गत रस्त्यांवर रस्ता ओलांडणाऱ्या प्रवाशांसाठी पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. मात्र अपंग प्रवाशांना पादचारी पुलावर चढणे कठीण होते. त्यामुळे नाइलाजास्तव जीव मुठीत धरूनच त्यांना रस्ता ओलांडावा लागतो. कोपरखरणे व रबाळे रेल्वे स्थानकांत अपंग प्रवाशांसाठी लिफ्टची सोय आहे. मात्र ती अनेकदा बंदच असते. ऐरोली, तुभ्रे, सानपाडा येथे रेल्वेच्या पादचारी पुलावर चढण्यासाठी अपंग प्रवाशांना सोय नसल्याने व रेल्वे रूळ ओलांडता येणे शक्य नसल्यामुळे दीड ते दोन किलोमीटरचा वळसा घालून रिक्षाने प्रवास करावा लागतो.