नवी मुंबईला मोठा खाडीकिनारा लाभला असून पक्ष्यांच्या २०० प्रजातींची नोंद मिळते, मात्र कोणते प्राणी आढळतात याबाबत शासकीय पातळीवर कोणती माहिती नसल्याचे समोर आले आहे. ऐरोली खाडीकिनारी नुकताच एक दुर्मीळ कोल्हा सापडल्यानंतर याबाबत कांदळवन विभागाकडे काहीही माहिती नसल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी मुंबईला तब्बल २४ किलोमीटरचा खाडीकिनारा लाभला आहे. एकेकाळी घनदाट वनराई असलेला हा किनारा आता अतिक्रमण आणि विकासाच्या नावाखाली बोडखा होत चालला आहे. मात्र आजही या ठिकाणी मोठय़ा प्रमाणत जैवविविधता आढळते. ऐरोली येथील जैवविविधता केंद्राकडे खाडीकिनारी २०० पक्ष्यांच्या जातींची नोंद करण्यात आली आहे. मात्र प्राण्यांच्या अस्तित्वाची नोंद दिसत नाही. मात्र नुकताच येथे एक दुर्मीळ कोल्हा आढळला. तसेच येथील मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार या खाडीत पूर्वी कोल्हे व इतर छोटे प्राणी मोठय़ा प्रमाणात होते. कोल्हेकुईचे आवाज येत, मात्र गेल्या काही वर्षांत ही कोल्हेकुई ऐकायला मिळत नाही. अधूनमधून चुकून कोल्ह्य़ांचे दर्शन होत असते. खाडीत आजही अनेक प्राणी असल्याचे स्थानिक मच्छीमार सांगतात. काही वर्षांपूर्वी वाशी खाडीकिनारी मृत अवस्थेतील दोन डॉल्फिन आढळून आले होते. सारसोळे खाडीत मच्छीमारांच्या जाळ्यात दुर्मीळ सोनेरी मासाही अडकला होता. तर उरण खाडीकिनारी गर्द झाडीत बिबटय़ाचेही दर्शन काही वर्षांपूर्वी अनेकांना होत होते. मात्र याबाबत अद्याप कुठलेही सर्वेक्षण झाल्याची माहिती मिळत नाही.

वनसंपदामंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी ऐरोली येथील जैवविविधता केंद्र हे केवळ पर्यटन केंद्र नसून अभ्यास केंद्र आहे. मग या केंद्राकडे येथील जैवविविधतेची परिपूर्ण माहिती असायला हवी, ही अभ्यासकांची माफक अपेक्षा आहे.

खाडीकिनारी आढळून येणाऱ्या कुठल्याही प्राण्याची नोंद ठेवली जात नाही. या प्राण्यांची नोंद ठेवण्याची सध्या तरी कोणतीही योजना नाही. मात्र पक्ष्यांची नोंद ठेवण्यात आलेली आहे.

-एस वासुदेवन, आयुक्त, कांदळवन विभाग