गणेशोत्सव व नवरात्रोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण करणाऱ्या तसेच रस्ता अडवून मंडप टाकणाऱ्या पनवेल व उरणमधील २४ मंडळांविरोधात पोलिसांनी सोमवारी न्यायालयात खटले दाखल केले. या पाश्र्वभूमीवर वर्षअखेरीच्या रात्री नववर्षांचे स्वागत करण्यासाठी डीजेचा ढणढणाट करू पाहाणाऱ्या हौशी मंडळींना पोलिसांनी एक प्रकारे इशाराच दिला आहे.
उत्सवकाळात नियमांचा भंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई का केली नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने साहाय्यक पोलीस आयुक्तांना केली होती. याबाबत स्पष्टीकरण देताना पनवेल व उरण परिसरातील २४ दोषी मंडळांविरोधात संबंधित न्यायालयात खटले दाखल केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी नोंदविली. नियम मोडणाऱ्यांमध्ये अनेक मंडळांचे प्रतिनिधित्व विविध राजकीय पक्षांचे नेते करीत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात या प्रकरणाची सुनावणी होणे अपेक्षित आहे. यात ही मंडळे दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना एक लाख रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे. या कारवाईच्या धसक्यामुळे वर्षअखेर धूमधडाक्यात साजरा करू पाहाणाऱ्या गृहनिर्माण सोसायटय़ा, पनवेलच्या महामार्गावरील ढाबे, मोठी हॉटेल्स आदी ठिकाणी वाजणाऱ्या संगीतमय कार्यक्रमांमुळे ध्वनी प्रदूषण झाल्यास कारवाई करण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचे समजते.