03 June 2020

News Flash

फेरीवाल्यांच्या त्रासातून मुक्त करा!

ग्रामस्थांनी या संदर्भात पालिकेकडे वारंवार मागणी करूनही दैनंदिन बाजाराचे नियोजन केले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

 

|| पूनम सकपाळ

दैनंदिन बाजार नसल्याने वाहतूक कोंडी; स्वच्छतेबाबतही दुर्लक्ष

नवी मुंबई : शहरात दैनंदिन बाजाराचे नियोजन करणाऱ्या महापालिका प्रशासनाला घणसोली गाव परिसरात याचा विसर पडल्याने आजही या ठिकाणी रविवारी आठवडे बाजार भरतो. नियोजनाअभावी फेरीवाल्यांनी पदपथ, रस्ते अडवले आहेत. यामुळे या परिसरात वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होत आहे. रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी तर चालण्यासाठी पदपथही शिल्लक राहत नाहीत. येथील ग्रामस्थांनी या संदर्भात पालिकेकडे वारंवार मागणी करूनही दैनंदिन बाजाराचे नियोजन केले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

या परिसरात वाहतूक कोंडीसह, स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था या समस्या कायम आहेत.   घणसोली विभागात एकूण १४ प्रभागांचा समावेश असून त्यापैकी प्रभाग क्रमांक १९, २०, २४, २५, २६, २८, २९ हे विभाग प्रामुख्याने घणसोली गाव, रबाळे एमआयडीसी दुभाजकाच्या अलीकडचा भाग, गोठीवली गावात येतात. प्रभागातील जास्तीतजास्त भाग हा घणसोली गावात येत असून या ठिकाणी अधिकृत दैनंदिन बाजाराची मोठी समस्या आहे.

महापालिकेने शहरात नागरिकांसाठी दैनंदिन बाजाराचे नियोजन केले आहे. यात भाजी मंडई, मासळी मार्केट उभारली आहेत. यामुळे दैनंदिन खरेदीसाठी नवी मुंबईकरांना स्वतंत्र बाजार व्यवस्था झाली आहे. मात्र, घणसोली गाव परिसरात अद्याप पूर्वापार भरत असलेला आठवडी बाजार भरत आहे. यामुळे घणसोली गावातील डी-मार्टपर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. या रस्त्यावरून पुढे रबाळे, तळवली, गोठिवली, ऐरोली येथे जाण्यासाठी रस्ता असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र हा आठवडी बाजार या मुख्य रस्त्यावरच भरत असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून वाट काढावी लागत आहे. या परिसरात फेरीवाल्यांची समस्या एवढी गंभीर आहे की, गावातील घरांच्या ओटय़ांवरही त्यांनी ताबा घेतलेला असतो. याबाबत रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

प्रभाग आरक्षणामुळे राजकीय उलथापालथ

प्रभाग क्रमांक १९, २०, २४, २५,२६,२८ व २९ यातील काही प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने दिग्गज नेत्यांना याचा फटका बसला आहे. प्रभाग क्रमांक १९, २० मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित झाल्याने माजी महापौर सुधाकर सोनवणे तसेच प्रभाग २० मध्ये रंजना सोनवणे यांनादेखील फटका बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रभागांत सुधाकर सोनवणे यांचे आतापर्यंत वर्चस्व राहिले. मात्र आता तो महिलांसाठी आरक्षित झाल्याने सोनवणे त्यांच्या मर्जीतल्या मागासवर्गीय महिलांना संधी देऊ  शकतात. तसेच प्रभाग क्रमांक २४ मध्ये काँग्रेसच्या उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे सध्या नगरसेविका असून ही जागा सर्वसाधारण झाली आहे. त्या आपला मुलगा अनिकेत म्हात्रे यांना महाआघाडीतर्फे रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत. प्रभाग क्रमांक २५,२७, २८,२९ या प्रभागांत महिला आरक्षण आहे.’

झोपडपट्टी पुनर्वसनाची मागणी

प्रभाग क्रमांक १९, २०मध्ये पंचशीलनगर, क्रांतीचौक हा झोपडपट्टी विभागात येत असून या दोन्ही प्रभागांत मूलभूत व शैक्षणिक सुविधांबाबत नागरिक समाधानी दिसतात. झोपडपट्टी पुनर्वसन हा येथील प्रलंबित प्रश्न आहे. एसआरएअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे

उद्याने, मैदाने यांचा अभाव

प्रभाग क्रमांक २५ साठेनगर, प्रभाग क्रमांक २७, २८ शंकरबुवा वाडी, प्रभाग क्रमांक २९ बौद्धवाडी हे प्रभाग घणसोली गावात येतात. प्रभाग २७ मध्ये औद्योगिक पट्टाही येतो. या भागात मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच प्रभाग २८ सेक्टर २१ मध्ये समाज मंदिर, उद्याने, मैदान नाही. येथील काही मोकळे भूखंड सिडकोकडून अद्याप हस्तांतरण झाले नसल्याने या सुविधा उपलब्ध करून देण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

मलनि:सारण वाहिन्यांची कमतरता

प्रभाग क्रमांक २४ मध्ये गोठीवली गाव येत असून या प्रभागात मूलभूत सुविधाही नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गावठाण भाग असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. गावात मलनि:सारण वाहिन्या अद्याप नाहीत. गटारे उघडी असल्याने घाणीचे साम्राज्य आहे. दुर्गंधी पसरत आहे. तसेच या ठिकाणी मुलांना हक्काचे मैदान व उद्याने नाहीत. पदपथही नाहीत. रबाळे गावात शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसून केवळ सातवीपर्यंत शाळा आहे. रस्त्यांची अवस्था बिकट आहे.

विद्यमान नगरसेवक

  •  प्रभाग क्रमांक १९ :  सुधाकर सोनवणे (अपक्ष )भाजप
  •   प्रभाग क्रमांक २० :  रंजना सोनवणे (भाजप)
  • प्रभाग क्रमांक २४ : मंदाकिनी म्हात्रे (काँग्रेस)
  • प्रभाग क्रमांक २५ : अनिता मानवतकर (काँग्रेस)
  •  प्रभाग क्रमांक २६ : लक्ष्मीकांत पाटील (भाजपा)
  • प्रभाग क्रमांक २८ : मोनिका पाटील (भाजप)
  • प्रभाग क्रमांक २९ : नीलम जगताप (भाजप)

घणसोली गावामध्ये दर रविवारी भरणारा आठवडा बाजार ही ग्रामस्थांची सोय होण्यापेक्षा डोकेदुखी ठरत आहे. याबाबत वारंवार पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊनही ठोस पावले उचलली जात नाहीत. पालिकेकडून फेरीवाल्यांवर कारवाई होते, मात्र नावापुरती. या आठवडी बाजारात गर्दीचा गैरफायदा घेत चोरी, महिलांची छेडछाड असे प्रकारही होत आहेत.

– मिलिंद पाटील, घणसोली ग्रामस्थ

 

रबाळे भुयारी मार्गातून बाहेर पडताच ठाणे-बेलापूर महामार्गावर आल्यानंतर हा रहदारीचा रस्ता ओलांडणे धोक्याचे झाले आहे. १५ ते २० मिनिटे थांबून रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी पूल बांधावा. या परिसरात चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. एमआयडीसीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. पार्किंगची समस्या गंभीर होत आहे. हक्काचे मैदान नसल्यामुळे मोकळ्या जागेत मुलांना खेळावे लागत आहे.

– महेंद्र कुंभार, रबाळे

 

गोठिवली या गावठाण भागात मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात आलेली नाही. शहराबरोबर गावठाणांच्या विकासावरही लक्ष देण्याची गरज आहे. मलनि:सारण वाहिन्या नसल्याने दुर्गंधी नकोशी होत आहे.

– नीलेश पाटील, गोठिवली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 12:06 am

Web Title: no traffic in the daily market regardless cleanliness akp 94
Next Stories
1 पालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी २३ मार्चला
2 दोन वर्षे नातेवाईकांशी संपर्कच नव्हता
3 पाणथळ जमिनी ‘सेझ’च्या घशात
Just Now!
X