25 January 2021

News Flash

उरणमधील पुनाडे धरण बारा वर्षांत प्रथमच आटले

धरणाची पाणी क्षमता वाढविण्याचा निर्णय कमिटीने घेतल्याची माहिती विद्यमान अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी दिली.

उरण तालुक्यातील रानसई आदिवासी वाडीनंतर पावसाचे आगमन होण्याच्या वेळीच पुनाडे धरण आटल्याने आता पूर्व विभागातील आणखी आठ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून धरणाच्या खोलीकरणाचे काम आठ गाव पाणीपुरवठा योजना कमिटीने सुरू केले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून परवानगी घेण्यात आली आहे. आठ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुनाडे धरणावर आधारित नळ पाणीपुरवठा योजना सुरू केल्यापासून बारा वर्षांत प्रथमच धरण आटल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. या टंचाईग्रस्त आठ गावांना उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्या प्रयत्नाने दहा रोजच्या टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे.

रानसई धरणांतील पाणी कमी पडत असल्याने व अनेक वर्षे पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या उरण पूर्व विभागातील आठ पुनाडे धरणातून पाणी पुरवठय़ाची योजना सुरू करण्यात आली. त्यामुळे पुनाडे वेशणी, सारडे, कडाप्पे, आवरे, पाले, पिरकोन, गोवठणेबरोबरच उरण तालुक्यातील आठ गावांना पाणीपुरवठा सुरू होता. येथील शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघू पाठबंधारे विभागाने पुनाडे धरण बांधलेले होते. मात्र धरणाला गळती लागल्याने धरण पडून होते. येथील नागरिकांनी आठ गाव पाणीपुरवठा कमिटीची स्थापना बारा वर्षांपासून नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आल्याची माहिती कमिटीचे माजी अध्यक्ष जीवन गावंड यांनी दिली. तर २०१५ मध्ये धरण परिसरात ५० टक्केच पाणी झाल्याने या बारा वर्षांत प्रथमच धरण आटले आहे. त्यामुळे धरणाची पाणी क्षमता वाढविण्याचा निर्णय कमिटीने घेतल्याची माहिती विद्यमान अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी दिली. या धरणातून गाळ काढण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च न करता हे काम करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर आठ गावांना एक दिवस आड धरणातील शिल्लक पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्याच प्रमाणे जोडीला प्रत्येक गावाला उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी केलेल्या आवाहनानुसार येथील गोदामांनी आठ तर स्वत:कडून दोन अशा दहा टँकरमार्फत दररोज एक टँकर पिण्याच्या पाण्यासाठी पुरविला जात आहे.

रानसई धरणानेही तळ गाठला

उर्वरित उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणानेही तळ गाठला असून अवघा एक आठवडा पुरेल इतकाच जिवंत साठा शिल्लक आहे. तर जून महिन्याच्या अखेपर्यंत मृत साठय़ातील पाणीपुरवठा करता येईल. तसेच हेटवणे धरणातून सध्या दिवसाला ७ एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याची माहिती उरणच्या एमआयडीसीचे सह.अभियंता रणजीत काळेबाग यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 2:43 am

Web Title: no water in punade dam in uran
टॅग Uran
Next Stories
1 सात नगरसेवकांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार
2 सरकारमधील असमन्वयावर विरोधकांची टीकेची झोड
3 ‘त्या’ अपघातग्रस्त खासगी बसचालकाकडून वेगाचे उल्लंघन?
Just Now!
X