दुरुस्ती कामामुळे सोमवारी सायंकाळपासून पाणी नाही

नवी मुंबई</strong> : भोकरपाडा जलशुद्धीकरण उपकेंद्रातील दुरुस्तीचे काम महावितरणने हाती घेतल्याने सोमवारी सायंकाळी व मंगळवारी दिवसभर काही भागात पाणीपुरवठा झाला नाही. सोमवारी पूर्वकल्पना न देताच पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे अनेक भागांत पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय झाली.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असल्याने बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांत मंगळवारी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच जलवाहिनीवरील थेट नळ जोड असणाऱ्यांचा सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधीलही पाणी पुरवठा बंद राहील, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र सोमवारी सायंकाळीच शहरातील काही भागांत पाणीपुरवठा झाला नाही. तसेच मंगळवारी सकाळी पाणी आले मात्र विजेअभावी कोपरखैरणे, सिडको वसाहती, घणसोली या परिसरात पाणीपुरवठा झाला नाही. सोमवारी अचानक पाणीपुरवठा विस्कळीत झाला तर मंगळवारीही पाणी न आल्याने अनेकांची गैरसोय झाली. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महावितरणने भोकरपाडा येथील उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. सोमवारीही महावितरणाचे काम सुरू होते, त्यामुळे पाणीपुरवठा झाला नाही. मात्र मंगळवारी सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

– वसंत पडघम, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग