अवजड वाहनचालक एटीएमच्या रांगेत; वर्दळ घटली

सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या जनजीवनावरही परिणाम झाला आहे. उरणमध्ये बंदरावरील उद्योगातील तसेच इतर उद्योगांच्या मालाची ने-आण करणारी दहा हजारांपेक्षा अधिक वाहने सध्या रस्त्याबाहेर आहेत. हजारो वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र बदलले असून वाहनचालक पैसे काढण्यासाठी वाहने सोडून सध्या एटीएमच्या रांगेत उभे आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीही दूर झाली आहे.

करळ पूल ते जेएनपीटी बंदरांचे मुख्यद्वार तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील वाहतूक कोंडीचा फटका येथील नागरिकांना बसत असल्याने प्रवासात अनेक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी होत होत्या; मात्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय झाल्याने या मार्गावरून चालणाऱ्या हजारो कंटेनर वाहनांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे मागील आठवडय़ापासून वाहतूक कोंडीपासून प्रवाशांची मुक्तता झाली असल्याचे मत सिडकोतील कर्मचारी रामचंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केले. तर करळ पूल ते जेएनपीटी बंदरातील पीयूबी, वाय जंक्शन ते कंटेनर व जेएनपीटी बल्क गेटपर्यंत तीन ते चार रांगांत हजारो कंटेनर वाहने रस्त्यात उभी राहात असल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांना तसेच बंदरातील कर्मचाऱ्यानांही दखल देत वाहतूक नियंत्रण करावी लागायची. त्यात बदल झाला असून दोन ते तीन दिवस आम्हाला या रांगांत बंदरात प्रवेश करण्यासाठी राहावे लागत असल्याने या कालावधीत आमच्या पिण्याच्या पाण्याची, नाश्त्याची तसेच जेवणाची आबाळ होत असल्याचे मत जितेंद्र खिल्लारे या वाहन चालकांने दिली. तर वाहनांसाठी डिझेल मिळत असले तरी उपाशी पोटी रहावे लागत असल्याचे संजय निकाळजे यांनी सांगितले.

बंदरातील जेएनपीटी, दुबई पोर्ट तसेच जीटीआय या तीनही बंदरांत मिळून दररोज दहा हजारांपेक्षा अधिक कंटेनर वाहने ये-जा करीत होते. त्यात घट झाली आहे.

एस.डी.शिंदे, निरीक्षक न्हावाशेवा विभाग वाहतूक