अग्निसुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या ६७ उपाहारगृहांवर कारवाई

मुंबईतील कमला मिल दुर्घटनेनंतर राज्य सरकारने राज्यातील सर्व हॉटेल, उपाहारगृहे, हुक्का पार्लरची तपासणी करण्याचे आदेश दिल्याच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पालिकेने एकूण ४२७ उपाहारगृहांची तपासणी केली आहे. त्यातील ११३ उपाहारगृहांना नोटिसा बजावण्यात आल्या असून ६७ उपाहारगृहांवर कारवाई करण्यात आली आहे. अग्निशमन प्रमाणपत्र न घेणाऱ्या उपाहारगृहांची पाणी व वीज जोडणी खंडित करण्यात येणार आहे.

येत्या आठवडाभरात अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र न घेणाऱ्या तसेच सुरक्षा उपाययोजना न करणाऱ्या हॉटेलांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिले आहेत. महापालिका अधिनियमानुसार या हॉटेलांनी विविध कालावधींत या परवानग्या न घेतल्यास त्यांचे पाणी बंद करण्यात येईल. वीज खंडित करण्यात यावी, अशी शिफारस वीज वितरण मंडळाला करण्यात येणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. ज्या पालिका विभागांत विनाअग्निशमन परवाना हॉटेल चालविले जात आहे, तेथील विभाग अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.

स्थानिक विभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हॉटेलसमोरील मार्जिनल स्पेसमध्ये बेकायदा बांधकाम केल्याचे व अग्निशमन परवानगीविना ही हॉटेले चालवली जात असल्याचे आरोप होत आहेत. हे हॉटेल मालक विभाग अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन घडवत असल्याचे समजते.

मुंबईतील कमला मिल दुर्घटनेनंतर शहरातील सर्व हॉटेलांची तपासणी करण्यात आली आहे. यात ११३ हॉटेलांना अग्निशमन दलाची परवानगी नसल्याचे आढळले आहे. सुरक्षा व्यवस्था न करणाऱ्या हॉटेल मालकांवर कारवाई करत पाणी व वीज जोडणी तोडली जाणार आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका