१५० हून अधिक जणांची खारघरला धाव

राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नातेवाईकांच्या भागीदारीने उभ्या राहिलेल्या खारघर येथील हेक्ससीटीला शुक्रवारी सक्तवसुली महासंचनालयाने (ईडी) नोटीस बजावल्याच्या बातमीमुळे शनिवारी या प्रकल्पामध्ये हक्काच्या घरांसाठी मोठी रक्कम गुंतवलेल्या दिडशेहून अधिक गुंतवणूकदारांनी खारघरला धाव घेतली.
खारघर येथील हेक्ससीटी देवीशा कंपनीच्या १६० कोटी किमतीच्या जमिनीवर उभी आहे. २००९ पासून घरांसाठी या प्रकल्पामध्ये गुंतवणूकदारांनी कर्ज काढून गुंतवणूक केली आहे. मात्र, इडीने या प्रकल्पाला सील ठोकल्याच्या बातमीने गुंतवणूकदारांची झोप उडवली. खारघर येथे जमलेल्या गुंतवणूकदारांनी आज भुजबळांच्या विरोधात संताप व्यक्त केला.
साडेचार लाखात तीन वर्षांत घर देतो, असे सांगण्यात आल्याने गुंतवणूकदारांनी या गृहप्रकल्पामध्ये मोठय़ा प्रमाणात रक्कम गुंतवली. मात्र पाच वर्षांनंतरही ठप्प झालेले प्रकल्पाचे काम आणि शुक्रवारी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्ड्ररिंग अ‍ॅक्ट अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईच्या बातमीमुळे गुंतवणूकदारांनी या प्रकल्पाकडे धाव घेतली. गेल्या काही वर्षांत प्रकल्पाच्या दिरंगाईच्या काळात पिडीत गुंतवणूकदारांनी सरकारी यंत्रणा व प्रसारमाध्यमांपर्यत तक्रार करु नये यासाठी अनेकदा हेक्ससीटीच्या व्यवस्थापकांकडून विनवनी केली जात होती. मात्र, अखेर पोलीस, सक्तवसुली महासंचनालय आणि प्रसारमाध्यमांमध्ये हे प्रकरण आल्यामुळे या प्रकल्पातील सामान्य गुंतवणूकदार धास्तावले आहेत.
सुमारे साडेतीन हजार गुंतवणूकदारांचे या प्रकल्पामध्ये पैसे अडकले आहेत. मार्च महिन्यात या प्रकल्पातील गुंतवणूकदारांनी पंकज व समीर भुजबळ यांच्याविरोधात नवी मुंबईतील तळोजा पोलीस ठाण्यात ४५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलीसांची आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. देवीशा इन्फ्रां. कंपनीचे भागीदार पंकज भुजबळ, समीर भुजबळ, माधव धारप, सायन अप्पा केसरकर, अमित बलराज हे आहेत. नवी मुंबई पोलीसांनी नऊ महिन्यानंतरही या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक केलेली नसल्याचे कळते.