लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : करोनामुळे शाळा बंद असल्याने सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, मात्र नवी मुंबई महापालिकेच्या बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहोचत नसल्याचे उघड झाले आहे. यावर पर्याय म्हणून पालिका शिक्षण विभाग आता वंचित विद्यार्थ्यांना कृतीपुस्तिकांचे वाटप करणार आहे. आठवडाभरात घरोघरी वाटप होईल अशी माहिती पालिका शिक्षण अधिकारी यांनी दिली.

१५ जूनपासून  शासनाच्या आदेशावरून नवी मुंबई शहरातदेखील ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र पालिका शाळांतील विद्यार्थी या काळात शिक्षणापासून वंचित राहत आहेत. पालिका शाळांमध्ये शिकणारा विद्यार्थी हा मध्यमवर्गीय तसेच गरीब कुटुंबातील आहेत. एमआयडीसी विभागात राहणारा तसेच मोलमजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह असलेल्या घरातील मुले या शाळेत शिकत आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही.

गेल्या वर्षी महापालिका शाळेत सुमारे ३५ हजार विद्यार्थी होते. यात प्राथमिकचे ३०२५८ तर माध्यमिकचे ५२२९ विद्यार्थी होते. यातील सुमारे ६० टक्के विद्यार्थी हे ऑनलाइन शिक्षणास उपस्थित नसल्याचे दिसते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक वर्षे वाया जाण्याची शक्यता आहे.

या विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध व्हावे याकरिता पालिकेने रबाळे येथील शाहू महाराज शाळेने कृतीपुस्तिकांचा उपक्रम राबविला आहे, तो राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडाभरात ४ हजार विद्यार्थ्यांना कृती पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे. तर १५ दिवसांत स्वाध्याय पुस्तिकाही देण्यात येणार आहेत.

ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी कृतीपुस्तिका व स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
– योगेश कडूकसर, शिक्षण अधिकारी, महापालिका