मध्यावधी निवडणुकीच्या तयारीसही सुरुवात;  नवी मुंबईत प्रदेश कार्यकारिणीची बैठक

महाआघाडी सरकार हे फसवे सरकार असून त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर जनादेशाविरोधात जाऊन शिवसेनेने सत्तेसाठी व स्वार्थासाठी भूमिका बदलल्याने प्रखर विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना शनिवारी केले. नवी मुंबई महापालिकेत विकासाच्या तर औरंगाबादमध्ये विकासाबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढविणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या दोनदिवसीय राज्य अधिवेशनाचा प्रारंभ शनिवारी नवी मुंबईत नेरुळ येथील संकुलात झाला. चंद्रकांत पाटील, सहसरचिटणीस व्ही. सतीश, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, संघटनमंत्री विजय पुराणिक आदींच्या उपस्थितीत राज्यभरातील भाजपचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष यांची बैठक पार पडली. राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यावर  निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीविषयी या बैठकीत चर्चा झाली व भाजपची दिशा काय असावी, याविषयी पाटील व अन्य नेत्यांनी सूचना केल्या. महाआघाडी सरकार आपल्या चुकांमुळे आणि विसंवादामुळे काही काळातच कोसळेल. भाजपने प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका घेऊन संघर्ष सुरू करावा, असा निर्णय  घेण्यात आला.

या बैठकीतील चर्चेविषयी  माहिती देताना विनोद तावडे म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना फसविले आहे. पीक विमा, झोपडपट्टीवासीयांना घरे अशा अनेक मुद्दय़ांवर जनतेची फसवणूक होत आहे. आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. भाजप सरकारच्या कार्यकाळातील अनेक निर्णयांना महाआघाडी सरकारने स्थगिती दिली. शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांना, भरती महापोर्टलला स्थगिती दिली आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी ऑनलाइन पद्धती सुरू केली होती. त्यामुळे अशा फसव्या, भ्रष्टाचाराची कवाडे उघडणाऱ्या व दुटप्पी सरकारविरोधात भाजप रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे. भीमा- कोरेगावप्रकरणी सरकारने कायद्यानुसार निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली. उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीविषयी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

भाजपच्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन रविवारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते होणार असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस समारोप करणार आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या निवडणूक तयारीचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा व मतदान केंद्रनिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या.

नवी मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा

नवी मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असून काही जण भाजपला सोडून जात असले तरी गणेश नाईक व मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वात पुन्हा नवी मुंबईत भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त करीत महापालिकेसाठी मनसेशी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले.