एनआरआय परिसरासंदर्भात न्यायालयाचे आदेश 

एनआरआय खाडीकिनारी घालण्यात आलेला भराव आठ दिवसांत काढून टाकण्याचे आदेश मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लि., माटुंगा या कंपनीला शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिले. पालिकेचे उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी यांनी या कंपनीविरोधात वृक्षतोडीप्रकरणी तक्रार दाखल केल्यामुळे एनआरआय पोलिसांनी त्यांच्याविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे.

एनआरआय कॉप्लेक्स-२च्या बाजूला सेक्टर ६० येथील मोकळ्या भूखंडांवर खाडीकिनारी बेकायदा भराव घालण्यात आला होता. मोठय़ा प्रमाणात वृक्षतोडही करण्यात आली होती. याविरोधात पर्यावरणप्रेमी सुनिल अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली.

खाडीकिनारी पोकलेनच्या साहाय्याने मोठा खड्डा खोदण्यात आला होता. त्यातून निघालेली माती खाडीकिनारी टाकून भराव करण्यात येत होता. सभोवताली पत्रे लावून रात्रंदिवस काम करण्यात येत होते. भूखंडावर असलेली गुलमोहर व इतर झाडे पोकलेनच्या सहाय्याने उखडून काढण्यात आली होती.

ती मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. याच खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात रोहित पक्षी येतात. त्यामुळे ही वृक्षतोड आणि भराव पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय हानीकराक ठरेल, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

अग्रवाल यांनी १५ मार्च रोजी याचिका दाखल केली आहे. याच परिसरात प्रशस्त होल्डिंग पाँड आहे. एनआरआय ते चाणाक्य या परिरसात ८० हेक्टर जागा असून तिथे गोल्फ कोर्स व गृहसंकुलासाठी जागा आहे. परंतु ही जागा ना विकास क्षेत्र असताना जागेच्या वापरात बदल कसा केला, असा प्रश्न अग्रवाल यांनी याचिकेत केला आहे.

भराव काढून टाकल्याची कागदपत्रे कंपनीने पाणथळ जागांसंदर्भातील समितीकडे सादर केली होती, परंतु प्रत्यक्षात भराव तसाच असल्याने २८ मार्च रोजी वनविभागाने पंचनामा केला. त्यावेळी वनविभागाचे अधिकारी जयराम गौडा, पी. आर. चौधरी तसेच सिडको व इतर अधिकारी उपस्थित होते. प्रत्यक्ष खाडीकिनारी भराव घातल्याचा अहवाल वनविभागाने शुक्रवारी सादर केला. त्यानंतर आठ दिवसांत भराव काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने कंपनीला दिले आहेत.

पालिका व सिडकोच्या दुर्लक्षामुळे नवी मुंबईत अनेक ठिकाणी डेब्रिज टाकून होल्डिंग पाँड, कांदळवन बुजविण्याचे प्रकार घडत आहेत. तलाव बुजवून खेळाची मैदाने तयार केली जात आहेत. जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळेच खाडी किनाऱ्याच्या सौंदर्याला बाधा येत आहे.

नवी मुंबईत  विविध भागांत खाडी किनारी भराव घालून बेकायदा कामे केली जात आहेत. गोल्फ कोर्स व निवासी संकुलांच्या नावाखाली नियमांची पायमल्ली होत आहे. खाडी किनारी भराव घातल्याचा प्रकार समोर आल्यामुळे न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत खाडी किनारी भराव घालणाऱ्या कंपनीला आठ दिवसांत भराव काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुमारे १ हजार मीटरच्या परिसरात भराव घालण्यात आला आहे.

सुनिल अग्रवाल, पर्यावरणप्रेमी स्थानिक रहिवासी, एनआरआय, नेरुळ

एनआरआय खाडीकिनारी टाकलेल्या भरावाबाबत वनविभाग व इतर विभागांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर खाडीकिनारी भराव टाकला असल्याचा पंचनामा वनविभागाने न्यायालयाला सादर केला.

पी. आर. चौधरी, वनअधिकारी, नवी मुंबई</strong>