मुंबईनंतर आता नवी मुंबईही करोनाचे हॉटस्पॉट होत आहे. गेल्या काही दिवसांत दरदिवशी करोनाचे रुग्ण कमी अधिक प्रमाणात वाढत असून रुग्णांची संख्या शंभरीजवळ आली आहे. गुरुवारी १२ नव्या रुग्णांची यात भर पडली असून शहरातील करोना रुग्णांची संख्या ९७ पर्यंत गेली आहे. तर पनवेलमध्येही तीन नव्या रुग्णांची भर पडली आहे.

बुधवारी महापे येथील एका आयटी कंपनीतील १९ कर्मचाऱ्यांचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने खळबळ उडाली होती. त्यातील आठजण हे नवी मुंबई शहरातील रहिवासी आहेत. गुरुवारी यातील आणखी एकाची भर पडली आहे. तो कोपरखैरणे येथील रहिवासी आहे. तसेच नवी मुंबई राहणारे व मुंबईत रुग्णालयात काम करणारे दोन डॉक्टर व एका परिचारिकेलाही करोना संसर्ग झाला आहे. यातील एक डॉक्टर हे सायन रुग्णालयामधील असून ते वाशी सेक्टर १७ येथील रहिवासी आहेत. तर दुसरे डॉक्टर हे भायखळा येथील रुग्णालयात काम करणारे व सीवूड्स सेक्टर ५० येथील रहिवाशी आहेत. राजावाडी येथील परिचारिका असून ती सानपाडा सेक्टर ९ येथे राहत आहेत. यांच्यासह नेरुळ (शिवाजीनगर), बोनकोडे गाव, ऐरोली (दिवा), वाशी, कौपरखरणे व तुर्भे या विविध उपनगरांतील इतर रुग्ण आहेत.

पनवेलमध्ये तीन नवे रुग्ण

पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे वसाहतीमधील सेक्टर ३६ आणि ११ येथे राहणाऱ्या दोन महिलांना बुधवारी रात्री करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. या दोनही महिला मुंबई येथील राजावाडी आणि के.ई.एम. रुग्णालयात काम करतात. तसेच उलवा येथील सेक्टर २५ येथे राहणारे आणि नवी मुंबईतील तेरणा रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागात काम करणाऱ्या एका डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे.