16 October 2019

News Flash

रिक्षांचा बेशिस्त ‘मुक्त’ संचार

अनेकदा प्रवाशांना इच्छित स्थळी नेण्यासाठी जादा भाडे आकारणी केली जाते किंवा नकार दिला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

मुक्त परवान्यांमुळे १८ हजारांवर संख्या; भाडय़ासाठी स्पर्धा

पूनम धनावडे, नवी मुंबई

वाहनचालकांच्या बेशिस्तीच्या बेपर्वाईमुळे नवी मुंबईची बदनामी सुरू असून यात रिक्षाचालकांचा मुजोरीचाही समावेश आहे. वाहतूक नियमांना फाटा देत भाडे मिळवण्यासाठी त्यांचीही स्पर्धाच लागलेली दिसत आहे. याला कारण प्रादेशिक परिवहन विभागाने देवू केलेले मुक्त परवाने आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील रिक्षांची संख्या आता १८ हजारांच्या घरात गेली असून दोन वर्षांत ५ हजारांची वाढ झाली आहे.

सन २०१६ पर्यंत परिवहन विभागाकडून रिक्षा परवान्यांवर बंधने होती. मात्र २०१७ मध्ये ही बंधने उठवून ‘मुक्त परवाने’ धोरण आणल्याने मोठी वाढ होत आहे. नव्याने ५ हजार ६४ नवीन रिक्षांची भर पडली आहे.

या वाढत्या रिक्षांमुळे शहारात रस्त्यावर कुठेही, चौका-चौकात असंख्य रिक्षा उभ्या दिसतात. प्रवाशांच्या तुलनेत रिक्षांचीच संख्या वाढल्याने रांगेत उभे राहिल्यास ताटकळत बसण्यापेक्षा रस्त्यात मिळेल ते भाडे घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे शहरात कुठेही कसाही रिक्षांचा मुक्त संचार दिसत आहे.

अनेकदा प्रवाशांना इच्छित स्थळी नेण्यासाठी जादा भाडे आकारणी केली जाते किंवा नकार दिला जातो. तसेच इतर रिक्षा चालक त्या प्रवाशाला नेत असताना त्याला दमदाटी करून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत रिक्षांसाठी एकूण २२ हजार ७६८ नोंदणी झाली   आहे तर महिलांच्या अबोली रिक्षांचे ७७ परवाने दिले आहेत. दोन वर्षांत ५ हजार रिक्षांची वाढ झालेली आहे. या  एकूण १८ हजार रिक्षांकरिता केवळ १६२ अधिकृत रिक्षा थांबे आहेत.

नवीन परवाने घेण्यासाठी एका कुटुंबात किती परवाने दिले जावेत याचे बंधन नसल्याने अनेक परवाने घेण्याचे प्रकार वाढले आहेत. शिक्षणाची अट ८ वी पर्यंत असल्याने परवाने लगेच मिळतात. एकाच कुटुंबात कमीत कमी तीन परवाने घेऊ न परमिटधारक ते इतरांना रिक्षा भाडे तत्वावर देतात. यामुळे देखील रिक्षांची संख्या वाढत आहे. मात्र पुरेसे रिक्षा थांबे नाहीत, पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीतही भर पडत आहे.

एप्रिल ते डिसेंबरमध्ये  ६२८ रिक्षांवर कारवाई

दिवसेंदिवस शहरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढत आहे. वाशी परिवहन विभागाने एप्रिल ते डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण १ हजार ७२७ रिक्षांची तपासणी केली. यामध्ये बिल्ला नसणे, परमिट नसणे, युनिफॉर्म न घालणे, उद्धट वर्तणूक करणे तसेच मनमानी भाडे आकारणी, मीटरवर न चालविणे अशा ६२८ रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे. यामध्ये ३०४ चालकांचे परवाने काही कालावधीसाठी निलंबित केले आहेत. यातून १५ लाख ५४ हजार रुपये दंड वसूलही करण्यात आला आहे.

कमाईला ओहोटी

दोन वर्षांपूर्वी आम्ही प्रामाणिकपणे धंदा करून हजार ते दीड हजार दिवसाला कमवत होतो. मात्र मुक्त परवान्यांमुळे रिक्षांचे प्रमाण वाढले असून आता दिवसाला ५०० रुपयेही मिळणे मुश्कील झाले आहे. आताची तरुण मुले मुजोरी धंदा करतात. बदनामी मात्र आमची होते. आयुष्यभर रिक्षा चालवली आता कुटुंबाचे भागत नाही. दुसरे काही करू शकत नाही, अशी व्यथा दत्ता खोपडे या रिक्षाचालकाने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

अनधिकृत रिक्षाही वाढल्या एकटय़ा कोपरखैरणे

विभागात दररोज वाहतुकीशी संबंधित १००च्या आसपास तक्रारी येतात. पैकी परमिट नसणे,

उद्धट वर्तणूक, बिल्ला नसणे या २० ते ४० तक्रारी या रिक्षाचालकांच्या असतात, अशी माहिती कोपरखैरणे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कोंदरे यांनी सांगितले. यामुळे १८ हजार परवानेधारक असले तरी अनधिकृत रिक्षांचे प्रमाणही नवी मुंबईत जास्त असल्याचे दिसते.

सन २०१७ पासून मुक्त परवाने सुरू झाल्याने परवाने देण्यावर बंधने नाहीत. त्यामुळे रिक्षांची संख्या वाढत आहे. तसेच कुटुंबाचे देखील बंधन नाही.

-दशरथ वागुले, प्रादेशिक अधिकारी, परिवहन विभाग वाशी

जादा सीट, उलटय़ा दिशेने रिक्षा चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करून वचक ठेवला जात आहे. दररोज नियमांना डावलून रिक्षा चालविणाऱ्या चालकांना टार्गेट करण्यात येत आहे.

– सुनील लोखंडे, उपायुक्त, वाहतूक विभाग

First Published on January 11, 2019 12:53 am

Web Title: number of rickshaws in navi mumbai has gone up to 18 thousand