सिडको प्रदर्शन केंद्रात उपचार एकवटले; अन्य केंद्रे बंद

नवी मुंबई : नवी मुंबईत करोनाच्या दुसऱ्या लाटेत ११ एप्रिल २०२१ रोजी सर्वाधिक ११,६०५ करोना रुग्ण शहरात उपचाराधीन होते. त्यानंतर करोना संसर्ग कमी होत ही रुग्णसंख्या कमी होत आता शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजारापर्यंत खाली आली आहे. त्यामुळे शहरात करोना उपचारासाठी उभारलेली सर्व काळजी केंद्रे बंद असून सध्या वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात उपचार एकवटले आहेत. प्रदर्शनी केंद्रातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ८० टक्केपेक्षा जास्त झाल्यास इतर काळजी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील परिस्थिती गंभीर झाली होती. दैनंदिन रुग्णांची संख्या दीड हजारापर्यंत गेल्याने व बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण त्या तुलनेत कमी असल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली होती. ११ एप्रिल २०२१ रोजी सर्वाधिक ११,६०५ रुग्ण शहरांतील १४ करोना काळजी केंद्रासह वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्र व नेरुळच्या डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार घेत होते. खासगी रुग्णालयांतील खाटाही शिल्लक नव्हत्या. त्यामुळे करोना रुग्णांना प्रतीक्षेत राहावे लागत होते. वेळीच उपचार न मिळाल्याने घरीच रुग्णांची गंभीर परिस्थती निर्माण होत होती. घरून थेट रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर जात असल्याने मृतांचा आकडाही वाढला होता. त्यामुळे  पालिकेने शहरातील ६९०० खाटांची व्यवस्था वाढवून ती १२ हजार खाटांपर्यंत केली होती. मात्र त्यानंतर लागू झालेले करोना निर्बंध व उपाय योजनांमुळे हे संकट हळूहळू दूर झाले.

करोनाच्या पहिल्या लाटेत दैनंदिन सर्वाधिक रुग्णसंख्या  २० ऑगस्ट रोजी ४७७ होती, तर दुसऱ्या लाटेत ही संख्या ४ एप्रिल रोजी १४४१ पर्यंत गेली होती. सध्या दैनंदिन रुग्णांची संख्या शंभरपेक्षा कमी आहे व बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने उपचाराधीन रुग्ण कमी झाले आहेत. शहरात उपचाराधीन रुग्णसंख्या १ हजार ६० पर्यंत खाली आली आहे.

रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाने शहरातील करोना निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे पुढील काळात रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तिसऱ्या करोना लाटेला सामोरे जावे लागू शकते.

शहरातील उपचाराधीन रुग्ण

  • सिडको प्रदर्शन केंद्र : २५८
  • निर्यातभवन : ७

एमजीएम सानपाडा :     ४३

एमजीएम कामोठे :   ५

सिडको प्रदर्शन केंद्र

अतिदक्षता : ४१

  • गृह अलगीकरण :  २४१

शहरात करोनाची स्थिती अत्यंत नियंत्रणात असून उपचाराधीन रुग्णही कमी होत आहेत. शहरात संभाव्य तिसरी लाट आली तरीही वाशी सिडको प्रदर्शनी केंद्र येथे ८० टक्के रुग्ण झाल्याशिवाय इतरत्र करोना केंद्र सुरू करण्यात येणार नाहीत. पालिकेने खाटांची व्यवस्था केली आहे.

-संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त