ऐन हंगामात करपा रोग

ओखी वादळामुळे पडलेल्या पावसाचा स्ट्रॉबेरीला फटका बसला आहे. ऐन हंगामात पिकाला करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हंगाम महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात यात आहे.

वाशीच्या मुंबई कृषिउत्पन्न फळ बाजारात नोव्हेंबरच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते आणि डिसेंबरमध्ये मोठय़ा प्रमाणात आवक सुरू होतो. मात्र यंदा पाऊस लांबल्यामुळे आधीच हंगाम लांबणीवर पडला होता, त्यातच ओखी वादळामुळे पडलेल्या पावसाने पिकांच्या नुकसानीत भर घातली आहे.

फळधारणेला सुरुवात होत असलेल्या स्ट्रॉबेरीची फुले पावसामुळे गळून पडली आहेत, अशी माहिती पाचगणी येथील कृष्णा भिलारे या शेतकऱ्याने दिली. स्ट्रॉबेरीला करपा रोगाची लागण झाल्याचेही त्यांनी सांगितले. धुक्यामुळे उत्पादनात ७० टक्के ते ८० टक्के घट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पुढील उत्पादन घेण्यासाठी उत्तम व महागडी कीटकनाशके आणि औषधे यांची फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात बाजारभाव वाढण्याची शक्यता शेतकरी व व्यापारी व्यक्त करत आहेत.

दोन दिवसांच्या पावसामुळे एपीएमसी फळ बाजारात आलेल्या स्ट्रॉबेरीलाही फारसा उठाव नाही. त्यातच भिजलेली स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाल्यामुळे मलाचा दर्जा खालावला आहे. दोन दिवसांपूर्वी २८० रुपये प्रतिकिलो वर असणारी स्ट्रॉबेरी आता १६० रुपयांवर आली आहे. मात्र पिकाचे नुकसान झाल्याने आणि कमी पीक हाती येण्याची शक्यता असल्यामुळे स्ट्रॉबेरीचे दरवाढ होण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत.

पिकाला उभारीसाठी एक महिना

करपा रोगाची लागण झाल्याने फळे, फुले, पानांवर तपकिरी ठिपके पडले आहेत. हिवाळ्यात बहरणाऱ्या या पिकाला पावसाचा फटका बसल्याने, तसेच रोपावरील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने या रोगाची लागण झाली आहे. हा रोग झाल्यास व वेळीच काळजी न घेतल्यास रोप मरण्याची भीती असते. उत्तम औषधांची फवारणी, कीटकनाशके वापरून पीक वाचवण्यासाठी तारे वरची कसरत शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. यासाठी कमीत कमी महिन्याभराचा कालावधीत लोटणार आहे. त्यानंतर पिकाला उभारी येईल, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

अंजिरालाही गळती

स्ट्रॉबेरीबरोबरच अंजिराचाही हंगाम सुरू होतो. या पिकालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. फळे गळून पडत असल्याची माहिती अंजीर उत्पादक संजय काळे यांनी दिली. संपूर्ण वाढलेल्या अंजिरात पाणी शिरल्याने फळाचे आयुष्य कमी झाले आहे. वाशीच्या फळबाजारात दोन दिवसांपूर्वी १५० रुपये प्रातिकिलोने मिळणारे अंजीर २० रुपयांवर आले आहे, असे त्यांनी सांगितले. साधारण ८ ते १० दिवसांनी अंजीर उत्पादन पूर्वपदावर येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.