19 February 2020

News Flash

नव्या मुंबईत जुने उद्योग डबघाईला

टीटीसी औद्योगिक वसाहतीत १० ते १५ टक्के ‘स्लोडाऊन’ सुरू झाले असून उत्पादन घटले आहे.

विकास महाडिक, नवी मुंबई

आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे-बेलापूर औद्योगिक (टीटीसी) वसाहतीत सुईपासून संगणकापर्यंत उत्पादन करणाऱ्या कारखान्यांची स्थिती ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी झाली आहे. एरवी रात्रभर प्रकाशमान असणारे कारखाने आर्थिक मंदीमुळे संध्याकाळी ‘ब्लॅक-आऊट’ होत असून अनेक कारखान्यांच्या मालकांनी कामगारांचे पगार थकविले आहेत. काही बडय़ा कारखानदारांनी जमिनी विकून स्थलांतर केले आहे. तोच कित्ता गिरवताना येत्या काळात टीटीसी औद्योगिक वसाहतीमधून उत्पादन करणारे कारखाने हद्दपार होऊन त्या ठिकाणी केवळ सेवा क्षेत्राचा विस्तार होईल, अशी भीती उद्योजक व्यक्त करीत आहेत.

मुंबईतील केमिकल झोन हटविण्यासाठी साठच्या दशकात नवी मुंबईत सर्वप्रथम रासायनिक कारखान्यांनी मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व प्रकारच्या उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी या ठिकाणी बस्तान बसविले. नागरी आणि औद्योगिक वसाहतीत छोटे-मोठे पाच हजार ९५५ कारखाने असल्याची नोंद आहे. यांतील आता चार हजार कारखाने तग धरून असून गेल्या दहा वर्षांत येथील दहा टक्के कारखान्यांनी मोक्याच्या जमिनी विकून शेजारची राज्ये गाठली आहेत. चार हजार कारखान्यांमध्ये केवळ दहा टक्के मध्यम व मोठे कारखाने असून ९० टक्के छोटे कारखाने आहेत. हे सर्व कारखाने परावलंबी आहेत. स्थानिक करांमुळे अगोदर कंबरडे मोडलेल्या या कारखान्यांचे आर्थिक मंदीच्या सावटामुळे उरलेसुरले अवसानदेखील गळून गेले आहे. दोन ते तीन पाळ्यांमध्ये चालणारे कारखाने आता संध्याकाळी पाच वाजताच बंद करावे लागत असल्याचे लघू उद्योजक किरण चुरी यांनी सांगितले. मोठय़ा कारखान्यांच्या ऑर्डरवरच छोटय़ा कारखान्यांची भिस्त होती. परंतु ही मागणी कमी झाली आहे. बहुतांशी लघू उद्योजकांची चाळीस टक्के कामे कमी झाल्याचे चुरी यांनी सांगितले. ‘ओव्हर टाइम’ तर सोडाच पण काही कारखान्यांत पगार देण्यास मालक चालढकलपणा करीत आहे. मालकांची आर्थिक स्थिती समजून कामगारही सबुरीने घेत आहेत. टीटीसी औद्योगिक वसाहतीतील कारखाने आर्थिक मंदीच्या धास्तीने कारखाना बंद पडल्याचे सध्या तरी उदाहरण नाही. पण केलेल्या उत्पादनाला मागणीच नसल्याने तो गोडाऊनमध्ये पडून राहात असल्याचे चित्र आहे.

जागतिक आर्थिक मंदीचे परिणाम देशांर्तगत उद्योगधंद्यावर दिसू लागले आहेत. टीटीसी औद्योगिक वसाहतीत १० ते १५ टक्के ‘स्लोडाऊन’ सुरू झाले असून उत्पादन घटले आहे. ही स्थिती लवकरच सुधारेल अशी अपेक्षा आहे.

– परेश मेहता,  सचिव, स्मॉल स्केल आंत्रप्रेन्युर असोशिएशन, टीटीसी

टीटीसी औद्योगिक वसाहत : एकूण कारखाने ४०००

एकूण आर्थिक उलाढाल : ६० हजार कोटी

एकूण कामगार संख्या : १ लाख ७० हजार

First Published on September 6, 2019 5:38 am

Web Title: old industry in navi mumbai at last stage due to recession zws 70
Next Stories
1 राजकीय फलकबाजीचे पेव
2 पालिका रुग्णालयाबाहेर ऐरोलीत पार्किंग समस्या
3 गणेशोत्सवानंतर आरोग्याचे ‘विघ्न’
Just Now!
X