19 April 2019

News Flash

प्रदूषणाच्या नोंदीतही चुकारपणा

सोमवार आणि मंगळवारी ऐरोली ते कोपरखैरणे परिसरात सर्वत्र दाट धुरके पसरले होते.

(संग्रहित छायाचित्र)

पूनम धनावडे

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर जुनीच आकडेवारी

प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) संकेतस्थळावरील नवी मुंबईतील प्रदूषकांच्या नोंदी गेल्या महिनाभरात बदलण्यातच आलेल्या नाहीत. या आठवडय़ाच्या सुरुवातीला ऐरोली ते कोपरखैरणे या पट्टय़ातील रहिवासी धुरक्याने त्रस्त झाले असताना एमपीसीबीच्या संकेतस्थळावर जुलै महिन्यातील प्रदूषण सामान्य स्तरावर असल्याच्या नोंदी दर्शवण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांना धुरक्याविषयी विचारले असता तेदेखील धुरक्याविषयी अनभिज्ञ असल्याचे दिसले.

सोमवार आणि मंगळवारी ऐरोली ते कोपरखैरणे परिसरात सर्वत्र दाट धुरके पसरले होते. त्यामुळे श्वसनास त्रास होत होता आणि सर्वत्र धूसर दिसत होते. याविषयी एमपीसीबीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध होईल असे सांगण्यात आले, परंतु प्रत्यक्षात मात्र विभागवार हवा गुणवत्ता दर्शविणारी आकडेवारी जुन्या म्हणजेच जुलै महिन्यातील असल्याचे दिसले.

नवी मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता टिपण्यासाठी वाशी, नेरुळ, ऐरोली, राबळे, महापे या पाच विभागांत केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांत दररोज शहरात हवेची गुणवत्ता कशी आहे, हवा प्रदूषणमुक्त की प्रदूषित आहे याची माहिती संकलित केली जाते. त्यानुसार अहवाल तयार केला जातो. वाशी, नेरुळमध्ये असलेले हवा नियंत्रण केंद्र हे रहिवासी क्षेत्रात तर रबाळे, महापे हे औद्य्ोगिक क्षेत्रात आहे. ऐरोलीतील केंद्र हे ग्रामीण व इतर विभागांत मोडते.

संकेतस्थळावरील वाशीतील हवा गुणवतेच्या नोंदी तर २०१३ नंतर बदलण्यातच आलेल्या नाहीत. महापे, रबाळे व नेरुळ येथील नोंदी जुलै २०१८ मधील आहेत. केवळ ऐरोली विभागातील ऑगस्ट महिन्याच्या नोंदी संकेतस्थळावर आहेत. या केंद्रांतून दर २४ तासांनी हवेच्या गुणवत्तेची माहिती प्राप्त होते, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले. संकेतस्थळावर रोजच्या नोंदी दिल्या जातात असे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात जुलैच्याच नोंदी आढळल्या. एका अधिकाऱ्याने तर मोबाइल फोनवर ताज्या नोंदी दिसत नाहीत, पण संगणकावर दिसतात, असे उत्तर दिले. धुरक्याविषयी विचारले असता, पाहणी केली जाईल, असे सांगण्यात आले. शहरातील रहिवाशांची घुसमट होत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसले.

काही तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळावर ताजी माहिती उपलब्ध झाली नसेल. तसे झाले असल्यास नवी, ताजी आकडेवारी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

-अनंत हर्षवर्धन, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, नवी मुंबई

First Published on September 1, 2018 3:32 am

Web Title: old statistics on pollution control boards website