नवी मुंबई :  बनावट शिक्के व सह्या करून घर लाटल्याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदर प्रकरणी सदनिका २३ लाख रुपयांना विकत घेतली मात्र नोंदणी करताना अन्य व्यक्तीच्या नावाने केल्याचे निदर्शनास आल्याने फिर्यादीने गुन्हा नोंदवल्यानंतर एजंट विठ्ठल रसाळ याला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी राजेश भांबले यांनी २०१५ मध्ये शिरवणे येथे २३ लाख रुपयांना एक सदनिका जयेश धुमाळ यांच्याकडून विकत घेतली होती. याची पूर्ण रक्कम धुमाळ यांना दिली होती. मात्र त्या वेळी पैशांच्या कमतरता भासल्यामुळे नोंदणी मात्र केली नव्हती. कालांतराने २०२० डिसेंबरमध्ये पैशांची तजवीज झाल्यावर नोंदणी करावयाचे ठरवले. परिसरातच राहणाऱ्या एका महिलेच्या ओळखीने नोंदणी करण्यासाठी विठ्ठल रसाळ यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी रसाळ यांनी ९५ हजार रुपये सदनिका नोंदणीचा खर्च आणि वकिलाच्या फीपोटी २५ हजार रुपये खर्च सांगितला. त्यानुसार नोंदणी करण्यात आले. त्याची प्रत जानेवारी २०२१ मध्ये मिळाली मात्र त्यावर धुमाळ यांचेच नाव होते व घर नावाने न करता भाडेतत्त्वावर घेतले असे नमूद करण्यात आल्याचे आढळून आले. याबाबत एजंट रसाळ यांना विचारणा केली असता त्यांनी दुसरी प्रत आणून दिली मात्र ती प्रत बनावट वाटल्याने त्याबाबत नोंदणी कार्यालयातील एका परिचित व्यक्तीला प्रत दाखवली असता त्यांनी सह्य व शिक्के सर्वच बनावट असल्याचे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने राजेश भांबले यांनी एजंट रसाळ याच्याविरोधात दिलेल्या तक्रारीवरून १ लाख १७ हजारांची फसवणूक झाल्याने गुन्हा कोपरखैरणे पोलिसांनी नोंद केला आहे.

कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी या प्रकरणी आरोपी विठ्ठल रसाळ याला अटक केली आहे. त्याच्या चौकशीत त्याने याव्यतिरिक्त तीन प्रकरणांची माहिती दिली आहे. तो स्टॅम्प पेपरवर भाडेकरार करत व तोच नोंदणी क्रमांक ग्राहकाला देत होता. बोलण्यात वाकबगार म्हणून ग्राहकांची फसवणूक होत होती.