पाच दिवसांनंतरही अपुराच लसपुरवठा; आज कोव्हिशिल्ड व कोवॅक्सिनची केवळ दुसरी मात्रा

नवी मुंबई</strong> : नवी मुंबई महापालिकेला पाच दिवसांनंतर कोव्हिशिल्डच्या ४ हजार ४८० मात्रा तर कोवॅक्सिन २५२० मात्रा मिळाल्या, मात्र हा पुरवठा केवळ एका दिवसासाठी पुरू शकतो. त्यामुळे प्रशासनाने श्निवारी लसींची दुसरी मात्रा देण्याचे नियोजन केले आहे. तर पुढील पुढील तीन आठवडे दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.

नवी मुंबई शहरात रविवारनंतर लसपुरवठाच झाला नव्हता. त्यामुळे पालिका क्षेत्रात गेली चार दिवस फक्त कोवॅक्सिनची दुसरी मात्रा तीही फक्त पालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर देण्यात येत होती. शुक्रवारी लस मिळाली तीही अपुरीच आहे.

करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने व तिसऱ्या लाटेमध्ये डेल्टा प्लस विषाणूचा प्रादुर्भावाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत. परंतु रविवारपासून पालिकेला लसच मिळाली नाही तर पालिका लस देणार तरी कोठून असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे तसेच चिंतेचे वातावरण आहे.

वेगात लसीकरण करण्यासाठी पालिका प्रशासनाने १११ लसीकरण केंद्रांचे नियोजन केले आहे तर शहरात ७४ लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत, पण लसीकरण केंद्र आहेत, पण लसच नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. आज महापालिकेकडे ठाणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत पुरवठा होणारी लस प्राप्त झाली असून ही लस फक्त १ दिवसाला पुरेल एवढीच आहे. त्यामुळे नागरिकांना दुसरी मात्रा देणे क्रमप्राप्त असल्याने पालिका पुढील ३ आठवडे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण पूर्ण करण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. शहरात शनिवारी पालिकेची नेरुळ, वाशी, ऐरोली, तुर्भे येथील रुग्णालये तसेच वाशीतील कामगार रुग्णालयातील लसीकरण केंद्र तर २३ नागरी आरोग्य केंद्रे येथे दुसऱ्या डोसचे लसीकरण होणार आहे.

शुक्रवारी महापालिकेला लस प्राप्त झाली आहे. परंतु लसपुरवठा अपुराच आहे. त्यामुळे पालिकेने दुसऱ्या मात्रेचे लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे.

शनिवारी शहरातील ४ रुग्णालये व २३ नागरी आरोग्य केंद्र येथे लसीकरण होणार आहे. यापुढे लसपुरवठय़ावरच लसीकरण अवलंबून राहणार आहे.

-डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख

लसपुरवठा

* कोव्हिशिल्ड : ४४८० डोस

* कोवॅक्सिन : २५२० डोस