नागरिकांमध्ये तीव्र संताप; पाणीटंचाई दूर करण्यासाठी सिडकोचे नियोजन

पनवेल : अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी सिडकोवर मोर्चा काढला होता. यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होईल या अपेक्षेवर बसलेल्या नागरिकांना उलट पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. सिडकोने खारघर व तळोजामध्ये आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिडकोच्या या निर्णयावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे तर सिडकोने मात्र हाोागरिकांच्या हिताचा असल्याचे म्हटले आहे. या नियोजनामुळे पाणीपुरवठय़ात सुसूत्रता येईल आणि किमान आठवडय़ातील इतर दिवस तरी उच्च दाबाने पाणीपुरवठा होईल असे सिडकोचे म्हणणे आहे.

खारघर वसाहतीची पाण्याची मागणी ७२ दशलक्षलिटर पाण्याची असून या वसाहतीला हेटवणे आणि मोरबे धरणातून ६२ ते ६४ दशलक्षलिटर पाणीपुरवठा होतो. तसेच अनेक गृहनिर्माण संस्थांनी जलवाहिनीतून येणारे पाणी उपशासाठी मोटारपंपांचा वापर केल्याने सिडकोने बांधलेल्या ८० दशलक्षलिटर क्षमतेचे जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने हा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे तळोजा व खारघर वसाहतीला एका दिवसाची पाणीटंचाई सहन करून आठवडय़ातील इतर सर्व दिवसांसाठी ८० दशलक्षलिटर जलकुंभातून उत्कृष्ट दाबाने गृहनिर्माण संस्थांच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा देता येईल असे नियोजन केले आहे.  ही पाणीकपात सोमवार (२० सप्टेंबर) पासून करण्यात येत असल्याची माहिती सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गजानन दलाल यांनी दिली आहे. सिडको मंडळाच्या निर्णयाबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला असून खारघर तळोजा वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश रानवडे यांनी सिडको मंडळाच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.

सिडको म्हणते..एका दिवसाची पाणीटंचाई सहन केली तर आठवडय़ातील इतर सर्व दिवसांसाठी योग्य दाबाने गृहनिर्माण संस्थांच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होणार.