नवी मुंबईतील एका पुलाखाली दहशतवादी संघटना आयसिसच्या नावाने लिहिण्यात आलेल्या संदेशाच्या पार्श्वभूमीवर एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही संबंधिताला ताब्यात घेतले आली. उरण मधील खोपट गावातील खोपटे ब्रिजवर मंगळवारी आयसिस, अबु बकर अल बगदादी आणि 26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या समर्थनार्थ संदेश लिहिल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि पालघरसह संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच अनेक ठिकाणी सुरक्षाही वाढवण्यात आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी अनेक जणांची चौकशी केली. या चौकशीनंतर उरण जवळील खोपट गावातील एका व्यक्तीला गुरूवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती मूळ उत्तर प्रदेशची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ती व्यक्ती मानसिकरित्या अस्थिर असून ती यावर उपचार घेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चौकशीदरम्यान त्यानेच पूलाखाली असे चित्र काढल्याचे कबूल केले असून त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यानेच हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली. तसेच पूलाखाली लिहिण्यात आलेल्या संदेशामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचेही नाव लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही घटनास्थळाची पाहणी करून त्या ठिकाणी असलेले पुरावे गोळा केले आहेत. तसेच स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी अनेक मद्यपी येत असल्याचीही माहिती दिली आहे. आम्ही या प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासून पाहत आहोत, असे संजय कुमार म्हणाले.