तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी चाचण्यांवर भर

पनवेल : तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी पनवेल महापालिकेने करोना चाचण्यांवर भर दिला आहे. महिनाभरात एक लाखाहून अधिक चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे बाधितांची टक्केवारी २.६० टक्क्यांवर आली आहे. गृहनिर्माण संस्थेमध्ये एक किंवा दोन रुग्ण आढळल्यास त्या संपूर्ण गृहनिर्माण सोसायटी व वाणिज्य संकुलातील नागरिकांची करोना चाचण्या करण्यात येत आहेत.

नुकत्याच झालेल्या पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत नगरसेवकांनी सर्वच रहिवाशांची करोना चाचणी करणे योग्य नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करीत चाचण्यांवर भर दिला आहे.

पनवेलमध्ये बाधितांची संख्या व वेळीच उपचार मिळाल्याने करोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या महिन्यात १ लाख ०८ हजार ०८७ आरटीपीसाआर व प्रतिजन चाचण्या केल्या आहेत. महापालिका कार्यक्षेत्रातील चार प्रभागांतील प्रभाग अधिकारी पोलीस विभागाशी समन्वय साधून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील विविध पथके पनवेल शहर, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजा या नोडमधील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार चाचण्या करण्यात येत आहेत. या नोडमधील गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानके, बस स्थानके, डीमार्ट, भाजी बाजार, दुकाने, अत्यावश्यक सेवेतील दुकाने, चेक पोस्ट, शासकीय आस्थापना, औद्योगिक वसाहती तसेच प्रतिबंधित क्षेत्र या ठिकाणी दिवसाला सरासरी ४००० चाचण्या करण्यात येत आहेत.